Israel-Hamas War : इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेच्या दुस-या युद्धनौकेची भूमध्य समुद्राकडे कूच | पुढारी

Israel-Hamas War : इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेच्या दुस-या युद्धनौकेची भूमध्य समुद्राकडे कूच

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel-Hamas War : हमास-इस्रायल यांतील युद्धाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या युद्धात अमेरिका आणि ब्रिटन यांनी इस्रायलच्या बाजूने या आधीच एन्ट्री घेतली आहे. तर, हमासच्या बाजूने हिजबुला या दहशतवादी संघटनेसह इराण आणि लेबनॉन यांनी थेट पाठिंबा दिला आहे. यामुळे हे युद्ध शांत होण्याचे मार्ग जवळजवळ बंद होत चालले आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की ते लवकरच गाझा शहरावर हल्ला करणार आहेत. अशातच इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने भूमध्य समुद्रात दुसरी युद्धनौका पाठवल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेचा दहशतवादी गटाच्या समर्थकांना कडक संदेश (Israel-Hamas War)

संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी शनिवारी सांगितले की, अमेरिका पूर्व भूमध्य समुद्रात दुसरी युद्धनौका पाठवत आहे. लेबॅनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी संघटना तसेच इराणला हमासशी हातमिळवणी करण्यापासून रोखण्यासाठी ही दुसरी युद्धनौका पाठवण्याचा निर्णय पेंटागॉनने घेतला आहे. अणुशक्ती असलेली युद्धनौका पाठवून अमेरिकेने हमास या दहशतवादी गटाच्या समर्थकांना कडक संदेश दिला आहे आणि गाझापासून पश्चिम आशियातील इतर भागांमध्ये संघर्ष पसरणार नाही याची काळजी घेतली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यूएसएस आयझेनहॉवर लाल समुद्रात तैनात (Israel-Hamas War)

हमासने केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांतच अमेरिका इस्रायलच्या मदतीसाठी पुढे आली. अमेरिकेने इस्रायलला मदत करण्यासाठी थेट युद्धनौका आणि विमाने पाठवण्यास सुरुवात केली. आता पुन्हा त्यांनी भूमध्य समुद्रात दुसरी युद्धनौका पाठवली आहे. यूएसएस आयझेनहॉवरच्या नेतृत्वाखाली कॅरियर स्ट्राइक फोर्स 2 ने पश्चिम आशियाकडे कुच केली आहे. ही युद्धनौका लाल समुद्रात तैनात करण्यात येईल अशी शक्यता आहे. यापूर्वी पाठवण्यात आलेली यूएसएस गेराल्ड फोर्ड अंतर्गत कॅरियर स्ट्राइक फोर्स 12 ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात करण्यात आलेली आहे.

भूमध्य समुद्रात गेराल्ड युद्धनौका तैनात

अमेरिकेने युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच उत्तर भूमध्य समुद्रात गेराल्ड युद्धनौका तैनात केली. आता अमेरिकेने यूएसएस आयझेनहॉवर कॅरियर स्ट्राइक रवाना केला आहे. दोन्ही युद्धनौका अणुऊर्जेवर चालणाऱ्या आहेत. प्रदेशातील कोणत्याही मोठ्या शक्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच जमिनीवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे आणि F-18 लढाऊ विमाने या युद्धनौकांवर आहेत. (Israel-Hamas War)

राष्ट्रपती बायडेन यांचे खास लक्ष

ऑस्टिन यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आतापर्यंत एकूण पाच चर्चा झाल्या आहेत. नेतन्याहू प्रत्येक क्षणी हल्ल्याशी संबंधित माहिती बायडेन यांना देत आहेत. राष्ट्रपती बायडेन यांनी सांगितल्यानंतर स्ट्राइक ग्रुपला भूमध्य समुद्रात उत्तरेकडे पोझिशन घेण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून हे युद्ध वाढण्यापासून रोखता येईल.’

आयझेनहॉवर युद्धनौकेची खासियत

यूएसएस आयझेनहॉवर अणुऊर्जेवर चालणारी आहे. त्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने तैनात आहेत. त्यावर 90 फिक्स विंग हेलिकॉप्टर तैनात आहेत. ही तीच युद्धनौका आहे जिने आखाती युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयझेनहॉवर 1977 पासून यूएस नेव्हीमध्ये कार्यरत आहे. दरम्यान, गेराल्ड आणि आयझेनहॉवर या दोन्ही युद्धनौकांमुळे इस्रायली सैन्याची ताकद वाढणार आहे, आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे मत आहे.

Back to top button