पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर ५००० रॉकेट डागल्यानंतर इस्रालईचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध असल्याची घोषणा केली आहे. हमासला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असे नेत्यन्याहू यांनी म्हटले आहे. इस्राईलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लष्करी मोहीम सुरू केली असून त्याला Operation Iron Swords असे नाव दिले आहे. (Israel at War against Hamas)
नेतान्याहू यांनी हमासच्या हल्ल्यानंतर राष्ट्राला उद्देशून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणतात, "इस्राईलच्या नागरिकांनो हे युद्ध आहे. हा तणाव किंवा लष्करी मोहीन नाही. हे युद्ध आहे. आणि आपण हे जिंकणार आहोत. हमासला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे."
इस्राईलने या कारवाईला Operation Iron Swords असे नाव दिले आहे. इस्राईलने गाझा पट्टीत हल्ले सुरू केले असून जवळपास १२ लढाऊ विमान या मोहिमेत तैनात करण्यात आले आहेत. या हल्ल्यात पॅलेस्टाईनचे चार नागरिक ठार झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्राईलचे ४ नागरिक ठार झाले आहेत.
दरमान्य या संघर्षात युरोपियन युनियनने इस्राईलला पाठिंबा दिला आहे. इस्राईल लष्कराचे प्रवक्ते डॅनिएल हगारी यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने इस्राईलमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी हमासच्या हल्ल्यांचा निषेध केला असून युरोप इस्राईलच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.
गाझा पट्टी हा भाग पूर्वी पॅलेस्टाईनचा भाग होता आणि येथे स्वयंशासन होते. पण १९६७ला झालेल्या अरब-इस्राईल युद्धानंतर वेस्ट बँक, पूर्व जेरुजलेम या दोन भागांसह गाझा पट्टीही इस्राईलच्या नियंत्रणात आली. मिडटेरियन किनारपट्टीचा हा भाग आहे. गाझा पट्टीच्या सीमेला इजिप्त आणि इस्राईल येतात. गाझा पट्टीचा भूभाग ३६५ चौरस किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास लखनऊ इतका हा भाग आहे.
इस्राईलची निर्मिती १९४८ झाली. १९४८ला अरब-इस्राईल युद्ध झाले होते, त्यानंतर १९६७ पर्यंत हा भूभाग इजिप्तच्या ताब्यात होता.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू गाझा पट्टी हा भूभाग राहिला आहे. गाझा पट्टीवर आता जी निर्बंधांची स्थिती आहे, ती २००७पासून आहे. इस्राईल गाझा पट्टीची हवाईक्षेत्र आणि जमिनीवरील पाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन आहे. तसेच सीमेवर असणारे बहुतांश क्रॉसिंग पॉईंटही इस्राईलच्या ताब्यात आहेत. तर काही क्रॉसिंग पॉईंटवर इजिप्तचा ताबा आहे.
हमासने या कारवाईला अल अक्सा फ्लड (Al Aqsa Flood) असे नाव दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झाल्यानंतरची आताची जगातील सर्वांत मोठी भूसामरिक घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. इस्राईलने त्यांच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर दहशतावाद्यांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. गाझा पट्टीतून दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले आहेत, त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे इस्राईलच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. जेरुसलेममध्ये सायरनचे आवाज येऊ लागले आहेत, असे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
हमासने म्हटले आहे, "इस्राईलने आम्हाला ओलिस ठेवले आहे, आणि त्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, त्यांचे दिवस आता भरले आहेत. त्यांचे सर्व गुन्हे आम्ही आता संपवणार आहोत." (Israel-Palestine-escalation)
इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हेरझॉग यांनी ही संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या एक्स अकाऊंट त्यांनी म्हटले आहे, "आम्हाला इजा करू इच्छिणाऱ्यांवर आम्ही विजय मिळवू. आमचे लष्कर आणि बचाव पथक यांना बळ मिळावे, अशी मी प्रार्थना करतो. इस्राईलच्या नागरिकांना या संकटकाळाशी सामना करण्याची शक्ती मिळावी."
अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार हमासने लेबनॉनकडे सहकार्य मागितले आहे. हमास आणि लेबनॉन यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिलेले आहे. हमास ही संघटना लेबनॉनचा लष्करी गट हिजबुल्लाहला नेहमी मदत करत आला आहे. तर या दोघांना इराणचा पाठिंबा आहे, असे अल जझिराने म्हटले आहे. हमास ही संघटना इस्राईलच्या विरोधात लेबनॉन आणि इराण यांचीही एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा