पुढारी ऑनलाईन – गाझा पट्टीतून पॅलेस्टाईनमधील बंडखोर संघटना हमासने ५००० रॉकेट इस्राईलच्या दिशने डागले आहेत. यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यातील तणाव कमालीचा वाढला असून इस्राईलने 'युद्धजन्य' स्थितीची घोषणा केली आहे. तर हमास या संघटनेने हा फक्त पहिलाच हक्का आहे, असे सांगत आणखी हल्ल्यांचा इशारा दिला आहे. दरम्यान इस्राईलने गाझा पट्टीत लष्करी मोहीम सुरू केली असून लढाऊ विमानांसह प्रत्युतर दिले आहे. (Israel-Palestine-escalation)
या हल्ल्यात इस्राईचे ४ नागरिक ठार झाले आहेत, तर जखमींची संख्या १५ आहे. तर गाझा पट्टी येथे सुरू असलेल्या धुमश्चक्रीत पॅलेस्टाईनचे दोन नागरिक ठार झाले आहे.
हमासने या कारवाईला अल अक्सा फ्लड (Al Aqsa Flood) असे नाव दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झाल्यानंतरची आताची जगातील सर्वांत मोठी भूसामरिक घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. इस्राईलने त्यांच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर दहशतावाद्यांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. गाझा पट्टीतून दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले आहेत, त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे इस्राईलच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. जेरुसलेममध्ये सायरनचे आवाज येऊ लागले आहेत, असे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
हमासने म्हटले आहे, "इस्राईलने आम्हाला ओलिस ठेवले आहे, आणि त्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, त्यांचे दिवस आता भरले आहेत. त्यांचे सर्व गुन्हे आम्ही आता संपवणार आहोत." (Israel-Palestine-escalation)
इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हेरझॉग यांनी ही संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या एक्स अकाऊंट त्यांनी म्हटले आहे, "आम्हाला इजा करू इच्छिणाऱ्यांवर आम्ही विजय मिळवू. आमचे लष्कर आणि बचाव पथक यांना बळ मिळावे, अशी मी प्रार्थना करतो. इस्राईलच्या नागरिकांना या संकटकाळाशी सामना करण्याची शक्ती मिळावी."
अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार हमासने लेबनॉनकडे सहकार्य मागितले आहे. हमास आणि लेबनॉन यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिलेले आहे. हमास ही संघटना लेबनॉनचा लष्करी गट हिजबुल्लाहला नेहमी मदत करत आला आहे. तर या दोघांना इराणचा पाठिंबा आहे, असे अल जझिराने म्हटले आहे. हमास ही संघटना इस्राईलच्या विरोधात लेबनॉन आणि इराण यांचीही एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे.
अल जझिराने दिलेल्या वृत्तात इस्राईलेच १५ नागरिक जखमी झाल्याचे म्हटले आहे. यातील २ नागरिक गंभीर जखमी आहे, तर ६ जणांना मध्यम स्वरूपाची दुखापत झाली आहे. तर उर्वरित नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे. हमासच्या हल्ल्यात हे नागरिक जखमी झालेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
गाझा पट्टीच्या मध्य भागी असलेल्या बुरेजी कँप येथे इस्राईलच्या फौजा आणि हमास यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. यात पॅलेस्टाईनचे दोन युवक ठार झाले आहेत. पॅलेस्टाईन येथील वृत्तसंस्था WAFAने दिलेल्या माहितीनुसार ५ लोक जखमी झाले आहेत. जखमींना अल अक्सा शहिद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इस्राईलच्या संरक्षम मंत्रालयाने तातडीने कॅबिनेटची बैठक बोलवली आहे.
गाझा पट्टी हा भाग पूर्वी पॅलेस्टाईनचा भाग होता आणि येथे स्वयंशासन होते. पण १९६७ला झालेल्या अरब-इस्राईल युद्धानंतर वेस्ट बँक, पूर्व जेरुजलेम या दोन भागांसह गाझा पट्टीही इस्राईलच्या नियंत्रणात आली. मिडटेरियन किनारपट्टीचा हा भाग आहे. गाझा पट्टीच्या सीमेला इजिप्त आणि इस्राईल येतात. गाझा पट्टीचा भूभाग ३६५ चौरस किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास लखनऊ इतका हा भाग आहे.
इस्राईलची निर्मिती १९४८ झाली. १९४८ला अरब-इस्राईल युद्ध झाले होते, त्यानंतर १९६७ पर्यंत हा भूभाग इजिप्तच्या ताब्यात होता.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू गाझा पट्टी हा भूभाग राहिला आहे. गाझा पट्टीवर आता जी निर्बंधांची स्थिती आहे, ती २००७पासून आहे. इस्राईल गाझा पट्टीची हवाईक्षेत्र आणि जमिनीवरील पाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन आहे. तसेच सीमेवर असणारे बहुतांश क्रॉसिंग पॉईंटही इस्राईलच्या ताब्यात आहेत. तर काही क्रॉसिंग पॉईंटवर इजिप्तचा ताबा आहे.