#इराण हल्ला : इस्राईला धोका, संरक्षणात वाढ | पुढारी

#इराण हल्ला : इस्राईला धोका, संरक्षणात वाढ

जेरुसलेम : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेने शुक्रवारी पहाटे इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये इराणच्या Iranian Revolutionary Guards च्या उच्च प्रशिक्षित कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. या मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर मध्य पूर्व आशियातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. 

आपल्या सर्वोच्च लष्करी अधिका-याला मारल्यानंतर इराणने सूड घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यासक मध्य-पूर्व आशियात आणखी तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. इराणचा कट्टर शत्रू व अमेरिकेचे मित्र राष्ट्र इस्राईलनेही आपल्या देशात सुरक्षा वाढवली असून सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंझामीन नेतान्याहू हे आपला ग्रीस दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. त्यांनी तात्काळ लष्करी अधिका-यांची बैठक बोलावून देशातील सुरक्षेचा आढावा घेतला.

अधिक वाचा : अमेरिका इराणशी थेट युद्ध करणार?

टाइम्स ऑफ इस्राईलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्राईली लष्कराकडून पंतप्रधान नेतान्याहू यांना परिस्थितीविषयी सतत अपडेट्स देण्यात येत आहेत. तसेच कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल सुलेमानी यांच्या मृत्यूबाबत कुठल्याही मंत्र्याने मुलाखत अथवा मत व्यक्त करून नये असे आदेश देण्यात आले आहेत. इस्राईलमधील परिस्थिती बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

अमेरिकेच्या बगदादमधील एअर स्ट्राईकवर इस्राईलमधील विरोधी पक्षाचे नेते येर लापिड यांनी ट्विटरवरून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. इस्राईली आर्मी रेडियोच्या माहितीनुसार सर्वोच्च लष्करी अधिका-याच्या मृत्यूनंतर संतापलेला इराण हिज्बुल्लाह आणि हमास यांच्या मदतीने इस्राईलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इस्राईली लष्कराला अलर्ट राहण्याचे आदेश मिळाले आहेत. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील इस्राईली दूतावासांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. 

इस्राईली न्यूज आउटलेट Ynet चे रॉन बेन यिशाई यांनी आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, इराण बदला घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहिल. ते सीरिया आणि गाझामधून इस्राईलवर हल्ला करू शकतात. 

अधिक वाचा : अमेरिकेचा इराकमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक; ६ ठार

पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ संघटनेने इराणच्या सुलेमानी यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. इराणसाठी शोक संदेश पाठवून जनरल सुलेमानी यांनी पॅलेस्टाईनला मदत केली होती, असे हमासने म्हटले आहे. 

सीरियाच्या सीमेला लागून असलेले माउंट हरमन स्की रिसॉर्ट बंद करण्यात आले आहे. हा परिसर या आधीही मिसाईल हल्ल्याच्या निशाण्यावर राहिला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे इस्राईल लष्काराचे प्रवक्ते एविचय आद्रेई यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर ठार

इस्राईल नेहमीच इराणचे जनरल सुलेमानी यांना धोकादायक मानत होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सीरियातून ड्रोनच्या सहाय्याने इस्राईलवर हल्ला करण्यात आला होता. तो हल्ला इस्राईल लष्काराने परतवून लावला होता. या हल्ल्याच्या मागे जनरल सुलेमानी यांचा हाथ असल्याचे म्हणत कुड्स फोर्सने हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा आरोप केला होता. 

इस्राईलला नेहमीच सुलेमानीबद्दल शंका होती. सुलेमानी यांनी हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इस्राईलविरोधात ड्रोनवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. यातही सुलेमानी यांच्यावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा आरोप होता. या घटनेनंतर इस्त्राईली पंतप्रधान नेतान्याहू यांनी सुलेमानी आणि हिज्बुल्लाहच्या हसन नस्रल्ला यांना इशारा दिला होता.

अधिक वाचा : आखातावर युद्धाचे ढग

1998 साली जनरल सुलेमानी हे कुड्स फोर्सच्या प्रमुख बनले होते. १९९२ मध्ये ब्यूनस आयर्समध्ये इस्राईल दूतावासवर झालेल्या हल्ल्यात हिज्बुल्लाह या संघटनेला मदत केल्याचा आरोप कुड्स फोर्सवर होत. २००६ साली इस्राईल आणि हिज्बुल्लाह यांच्यादरम्यान झालेल्या युद्धात हिज्बुल्लाह संघटनेला इराणने केलेल्या मदतीसाठी सुलेमानी यांनी पुढाकार घेतला होता. अमेरिका आणि इस्राईल यांच्या ठिकाणानांवर हल्ला करण्यामागे हिज्बुल्लाह संघटनेचा हाथ होता, आणि या संघटनेला जनरल सुलेमानी इराणच्या माध्यमातून मदत करत होते, असा आरोप २०१० साली करण्यात आला होता. 

अधिक वाचा : #Iran इराणची अमेरिकेला बदल्याची धमकी

इस्राईलच्या शस्त्रू देशांना एकवटून मोठी फळी तयार करण्यात सुलेमानी हे आघादीवर होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये सुलेमानी यांनी राजधानी तेहरानमध्ये हमास संघटनेच्या प्रतिनिधिमंडळा सोबत बैठक घेतली होती. कुवेतचे वृत्तपत्र अल जरीदाच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०१८ मध्ये अमेरिकेने सुलेमानी यांची हत्या करण्यास इस्राईलला हिरवा कंदील दर्शविला होता. तीन वर्षापूर्वीही सुलेमानी यांना ठार करण्याची इस्राईलची योजना होती. मात्र, ही योजना पुर्णत्वास गेली नाही. अखेर नव्या वर्षाच्या तीस-या दिवशीच अमेरिकेने जनरल सुलेमानी यांची एअर स्ट्राईक करून हत्या घडवून आणली.

अधिक वाचा : #America इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च शक्तीशाली मेजर जनरलना अमेरिकेने का मारले?

Back to top button