आधी ‘पीओके’ रिकामे करा… भारताने पाकिस्तानला खडसावले | पुढारी

आधी ‘पीओके’ रिकामे करा... भारताने पाकिस्तानला खडसावले

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचे तुणतुणे वाजविले. त्यावर, आधी अवैधरीत्या बळकावलेले भारताचे भूभाग (पीओके, व्याप्त काश्मीर)रिकामे करा, अशा शब्दांत भारताने पाकला खडसावले. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर-उल-हक काकर यांनी सर्वसाधारण सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने, पाकिस्तान या व्यासपीठाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या अव्वल सचिव पेटल गहलोत म्हणाल्या, पाकला ही सवयच जडलेली आहे. भारताबद्दल दुष्प्रचार करण्याची कोणतीही संधी पाक सोडत नाही, स्वत:च्या अंतरंगात डोकावून बघणे तेवढे या देशाला जमत नाही. आपल्याच उपाशी देशबांधवांच्या भुकेची संवेदना काश्मीर-काश्मीर ओरडून दाबून मारण्याच्या प्रयत्नात पाकचे नेते असतात. प्रतिक्रिया देण्याच्या अधिकारांतर्गत गेहलोत यांनी पाकला हे सडेतोड उत्तर दिले. 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषींवर आधी कारवाई करा, दहशतवादाला आवर घाला, अल्पसंख्याक हिंदू, ख्रिश्चन, शिखांच्या मानवाधिकारांचे थोडेतरी रक्षण करा, असे सल्लेही गेहलोत यांनी पाकला दिले. जगात मानवाधिकारांची सर्वाधिक पायमल्ली पाकमध्ये होते, असेही त्यांनी जगाच्या निदर्शनाला आणून दिले.

पाक काळजीवाहू पंतप्रधान काकर सर्वसाधारण सभेत बोलताना म्हणाले, की आम्हाला भारताशी सलोख्याचे संबंध हवे आहेत, पण काश्मीरचा प्रश्न त्यातील अडसर आहे. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा आरोपही काकर यांनी केला. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली जम्मू-काश्मीरमध्ये जनमत जाणून घेऊन योग्य तो निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल काकर यांनी केला. ऑगस्ट 2019 पासून भारताने अवैधरीत्या ताब्यात घेतलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये 9 लाख सैनिक तैनात केलेले आहेत. काश्मिरी जनतेचे दमन करण्याचाच हा प्रकार आहे, असे काकर म्हणाले.

आमच्याकडे बोट दाखविण्याआधी आपले मोडकळीला आलेले घर पाकिस्तानने सांभाळावे, असे प्रत्युत्तर गेहलोत यांनी काकर यांना दिले. दहशतवादाला बहरण्याची संधी उपलब्ध करून देणारी इकोसिस्टीम आधी पाकने नष्ट करावी, असेही त्या म्हणाल्या. काश्मीर, लडाख हे भारताचे अभिन्न अंग आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असलेले सर्वाधिक दहशतवादी पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत, हे गेहलोत यांनी ठणकावून सांगितले.

हिंदू, ख्रिश्चन, शिखांवर अत्याचार

ऑगस्ट 2023 मध्ये पाकिस्तानात जारनवालामध्ये अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायाविरुद्ध मोठा हिंसाचार झाला. 19 चर्च पाडून वा जाळून टाकण्यात आले. 89 ख्रिश्चन कुटुंबांची घरे जाळली गेली. अहमदिया समुदायाची प्रार्थनास्थळे खुलेआम नष्ट केली जातात. हिंदू, शीख, ख्रिश्चन मुलींची अपहरणे होतात. जबरदस्ती धर्म परिवर्तन आणि मग जबरदस्ती निकाह असे सर्रास घडते. यंत्रणाही पीडित हिंदू, शीख, ख्रिश्चनांना अशा प्रकरणांत काही मदत करत नाहीत, हेही गेहलोत यांनी जगाच्या निदर्शनाला आणून दिले.

Back to top button