Lashkar-e-Taiba : लष्कर ए तोएबाच्या म्होरक्याची पाकिस्तानात हत्या; या वर्षातील तिसरी हत्या, ISI बुचकळ्यात | पुढारी

Lashkar-e-Taiba : लष्कर ए तोएबाच्या म्होरक्याची पाकिस्तानात हत्या; या वर्षातील तिसरी हत्या, ISI बुचकळ्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील कराची शहरता लष्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेचा हस्तक झियाउर रहमान याची हत्या करण्यात आली आहे. मोटर सायकलवरून आलेल्या दोघा युवकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. कराची शहरातील गुलिस्तान ए जौहार या परिसरात ही घटना घडली. (Lashkar-e-Taiba)
संबंधित बातम्या-
या हत्येनंतर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय संभ्रमात आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे. यापूर्वी खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजित सिंग पंजवार याचीही अशीच हत्या झाली होती. पंजवार हा भारतात वाँटेडच्या यादीत आहे. दोन्ही हत्या एकाच प्रकारे झाल्या आहेत.
रहमान याची हत्या १२ सप्टेंबरला झाली. रहमान कराचीतील जामिया अबू बकर या मदरशात प्रशासक म्हणून काम करत होता. या मदरशातून दहतवादी कारवाया केल्या जात होत्या. रहमान याची हत्या दहशतवादी घटना असल्याचे पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटले आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यातील वादातून ही हत्या झाली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पाकिस्तानत यापूर्वीही दहशतवाद्यांशी संबंधित प्रमुख व्यक्तींच्या हत्या झालेल्या आहेत.
१ मार्चला मिस्त्री जहूर इब्राहिम याची हत्या झाली होती. भारतीय विमान IC-814 हायजॅक करण्यात मिस्त्रीचा सहभाग होता. मिस्त्री हा जैश ए मोहमद या दहशतवादी संघटनेचा हस्तक होता.
स्थानिक परिसर माहिती असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांनी हे हत्याकाडं घडवले असावते, असा पाकिस्तानातील सुरक्षा एजन्सींचा दावा आहे.

Back to top button