जगात ३७५ वर्षांनी लागला ८ व्या खंडाचा शोध | पुढारी

जगात ३७५ वर्षांनी लागला ८ व्या खंडाचा शोध

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : जगातील आठव्या खंडाचा शोध लागला असून त्याचे पुरावेही मिळाले आहेत. न्यूझीलंडसारख्या दिसणाऱ्या या खंडाचा ९४ टक्के भूभाग पॅसिफिक महासागरात आहे. त्यामुळे तब्बल ३७५ वर्षांनी झिलँडिया नामक खंडाचा शोध घेण्यास भूगर्भशास्त्रज्ञांना यश आले आहे.

संबंधित बातम्या : 

भूगर्भशास्त्रज्ञांनी या खंडास झिलैंडिया (रियु-ए-मोऊई) असे नाव दिले आहे. जगात एकूण सात खंड आहेत. आठव्या खंडाचा शोध घेण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. महासागराच्या पाण्यात या खंडाचा ९४ टक्के भूभाग असल्याने याचा शोध लागण्यात अडचण येत होती. या खंडाचा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञांनी याचा नकाशा जारी केला आहे. पीएचवायएस. ओआरजी या संकेतस्थळावरून पुराव्यासह या खंडाचा नकाशा प्रसारित करण्यात आला आहे. टॅक्टोनिक्स या नियतकालिकेमध्येही या खंडाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. खडकाच्या नमुन्यावर संशोधन करून या नव्या खंडाचा शोध लावण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे. ८ वा खंड हा दिसायला न्यूझीलंडसारखा असून छोट्या आकाराचा आहे. वरकरणी छोटा वाटत असला तरी शोधण्यासाठी अविरत कष्ट उपसावे लागले आहेत, अशी प्रतिक्रिया भूगर्भशास्त्रज्ञ अँडी टुलोक यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेला दिली. ८ व्या खंडाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये अँडी यांचा समावेश आहे.

झिलैंडियाचा अभ्यासाचा विषय कुतुहलाचा बनला आहे. शास्त्रज्ञांनी या खंडावर खोदकाम करून खडक आणि मातीचे नमुने गोळा केले आहेत. या खंडाच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू, माती आणि गाळ याचेही नमुने घेण्यात आले आहेत. ५५० दशलक्ष वर्षापूर्वीच्या गोंडवन या महाकाय खंडाचाच झिलैंडिया खंड हा भाग आहे. दक्षिण गोलार्धातील भूभागात भूगर्भीय हालचालीमुळे गोंडवन गडप झाला होता. पश्चिम अंटार्टिका खंडातील भूगर्भातील साधर्म्य आठव्या खंडात सापडले असल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे न्यूझीलंडच्या पश्चिम किनारपट्टीनजीक असणाऱ्या कॅम्पबेल पठाराचाच हा मुळभाग असल्याचे संकेतही शास्त्रज्ञांनी दिले आहेत. झिलैंडियाचे क्षेत्रफळ ४.९ दशलक्ष चौरस किलोमीटर एवढे आहे. मादागास्करपेक्षा हा सहापट मोठ्या आकाराचा आहे. आठ खंडांपैकी हा सर्वात छोटा, लहान आणि तरुण खंड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूकंपशास्त्रज्ञांनी या खंडाचा नकाशा तयार केला आहे. २०२१ सालीही या खंडाबाबत अभ्यास करण्यात आला होता त्यावेळी हा खंड १०० कोटी वर्षांपूर्वीचा असावा, असा दावा करण्यात आला होता. भूकंप आणि भूगर्भातील हालचालींमुळे गोंडावनमधून या खंडाचा भूभाग अलग झाला असावा, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.

सध्याचे खंड

आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका

हेही वाचा : 

Back to top button