G20 Summit in Delhi | स्पेनचे राष्ट्राध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह; जी-२० परिषदेला राहणार गैरहजर | पुढारी

G20 Summit in Delhi | स्पेनचे राष्ट्राध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह; जी-२० परिषदेला राहणार गैरहजर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्यापासून दोन दिवस होणाऱ्या G20 परिषदेसाठी देशाची राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. ही परिषद ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील २८ हून अधिक देशाचे प्रमुख सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने दिल्लीतील परिषदेत ते सहभागी होणार नाहीत. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वत: ‘X’वरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज (दि.७ सप्टेंबर) दुपारी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे G20 शिखर परिषदेसाठी मी नवी दिल्लीला जाऊ शकणार नाही. सध्या मला बरे वाटत आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या जागी स्पेनच्या उपराष्ट्राध्यक्ष नादिया कॅल्व्हिनो आणि आर्थिक व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री युरोपियन युनियन आणि सहकार्य यांच्याद्वारे जी -20 शिखर परिषदेत प्रतिनिधित्व करतील, असेही ते म्हणाले.

G20 Summit in Delhi : G20 परिषदेला गैरहजर राहणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष

दिल्लीत होत असलेल्या G20 परिषदेला अनुपस्थित राहणारे स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रोसांचेझ हे तिसरे जागतिक नेते आहेत. यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते.

 G20 ला शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज

दिल्लीतील होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी भारत मंडपम येथे मंच तयार करण्यात आला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच G20 शिखर परिषद होत आहे. या कार्यक्रमाला अनेक जागतिक नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button