G20 Summit: जी-२० बैठकीसाठी जय्यत तयारी | पुढारी

G20 Summit: जी-२० बैठकीसाठी जय्यत तयारी

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: जी-२० परिषदेसाठी जगातील प्रमुख देशांचे सर्वोच्च नेतृत्व तीन दिवस दिल्लीत राहणार असल्याने या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच अन्य राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय शिष्टाचाराचीही पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

जगभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीदरम्यान राष्ट्रीय राजधानीमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये. तसेच समाजविघातक शक्तींना उपद्रवाची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना योग्य कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास त्यावरील तत्काळ कारवाईसाठी प्रशिक्षित जवान तैनात करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दिल्लीतील वास्तव्यासाठी घेतलेल्या हॉटेलमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, आपत्कालिन परिस्थितीसाठी वैद्यकीय साहित्य व पुरेसा औषध साठा, स्मोक ग्रेनेड, वायरलेस सेट यासाख्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सुरक्षा व्यवस्थेचा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासव्यवस्थेचा दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी आढावा घेतला. तसेच दिल्लीच्या सुशोभीकरणामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये असे आदेश नायब राज्यपालांनी संबंधित यंत्रणांना दिले. जी-२० परिषदेसाठी दिल्लीवर तब्बल ४१०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा निधी रस्त्यांची, पदपथांची डागडुजी, रस्त्यांवरील मार्गदर्शक खुणा करणे, सुशोभीकरण यावर खर्च करण्यात आला आहे. तर, सुशोभीकरणाच्या कार्यामध्ये १२ हजार कार्यकर्त्यांनी योगदान दिल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय राजधानी नटली असून, या निमित्ताने भारताच्या सांस्कृतिक वैभवाकडे या पाहुण्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी दिल्ली गेट परिसरामध्ये कोणार्कच्या सूर्यमंदिराची झलक दर्शविणारे शिल्प, महात्मा गांधी आणि चरख्याचे कटाऊट लावण्यात आले आहे.

दिल्लीत बहुतांश ठिकाणी शुकशुकाट

दिल्लीत आज जन्माष्टमीमुळे सर्व सरकारी कार्यालयांना सुटी होती. तर ८ ते १० कालावधीमध्ये जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षा कारणांमुळे प्रमुख भागांमधील व्यावसायिक आस्थापना देखील बंद ठेवण्याचे आदेश याआधीच दिले आहेत. अर्थात, या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आली असली तरी बहुतांश जणांनी जन्माष्टमीपासूनच सुटीचे नियोजन केले असल्यामुळे आज रस्त्यावर माणसांची आणि वाहनांची तुरळक हजेरी जाणवली. अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी बहुतांश भागांमध्ये शुकशुकाटच दिसून आला.

Back to top button