

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसाने आतापर्यंत २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. संततधार पावसाने दक्षिण ब्राझीलमध्ये पुराची तीव्रता आणखी वाढली असून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य करणेही कठीण झाले आहे.
ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुलचे गव्हर्नर यांनी याला त्यांच्या राज्यातील सर्वात मोठी हवामान आपत्ती म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक भागात हजारो लोकांना घरे सोडून जावे लागले आहे. मुकुम नावाच्या छोट्या गावात बहुतेक लोक त्यांच्या घराच्या छतावर अडकले होते. यापैकी अनेकांना हवाई मदतीद्वारे बाहेर काढण्यात आले आहे. या शहराचा सुमारे ८५ टक्के भाग पुराच्या पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३०० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलन झाले.
ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याला फेब्रुवारीमध्येही अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागला. त्यानंतर या आपत्तीत ४० जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी रेसिफे शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात १०० जणांना जीव गमवावा लागला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलजवळील अॅमेझॉन जंगलांच्या तोडणीचा परिणाम हवामानावर झाला असून वारंवार नैसर्गिक आपत्ती हे त्याचेच परिणाम आहेत.
हेही वाचा :