

लाहोर, वृत्तसंस्था : अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात श्रीलंकेने (Afghanistan vs Sri Lanka)अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव करून आशिया चषक स्पर्धेची सुपर-4 फेरी गाठली. अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य होते. परंतु, सुपर-4 साठी त्यांना ते 37.1 षटकांत पूर्ण करायचे होते. दोन्ही सलामीवीर एकेरी धावेत माघारी परतले. मात्र, मोहम्मद नबीने वन-डेतील वेगवान अर्धशतक झळकावताना कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह मॅच खेचून आणली. शाहिदीला त्याआधी रहमत शाहने चांगली साथ दिली. अफगाणिस्तानचा प्रत्येक फलंदाज इतिहास घडविण्याच्या निर्धाराने खेळताना दिसला. पण, श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालगेने एका षटकात दोन मोठ्या विकेट्स घेत सामना फिरवला. अफगाणिस्तानने अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली. पण श्रीलंकेने 37.4 षटकांत अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 289 धावांवर गुंडाळून सुपर-4 मध्ये धडक मारली.
अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. कसून राजिथाने त्यांना 27 धावांवर दोन धक्के दिले. गुलबदीन नैब (22) व रहमत शाह यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहमत (45) व कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी 71 धावा जोडल्या. सेट फलंदाज माघारी परतल्याने अफगाणिस्तानचे जिंकण्याचे स्वप्न पुसट होत चालले होते. पण, शाहिदी आणि मोहम्मद नबी यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेकार धुलाई केली. दासून शनाकाच्या एका षटकात दोघांनी 26 धावा कुटल्या. नबीने 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अफगाणिस्तानकडून वन-डेतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. (Afghanistan vs Sri Lanka)
नबी श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. हे वादळ रोखण्यासाठी श्रीलंकेने फिरकीपटू महिशा थीक्षणाला आणले अन् अपेक्षित निकाल मिळाला. नबीने टोलावलेला चेंडू धनंजयाने अप्रतिमरीत्या टिपला अन् नबी 32 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 65 धावांवर माघारी परतला.
अफगाणिस्तानला शेवटच्या 31 चेंडूंत 54 धावा हव्या होत्या. राशीदने 33 व्या षटकात पथिराणाला षटकार खेचला. त्यात नजीबुल्लाह झाद्रानही पार्टीत सहभागी झाला. 13 चेंडू 27 धावा असे समीकरण दोघांनी जुळवून आणले. 3 विकेट्स घेणार्या राजिथाने टाकलेल्या 32 व्या षटकात दोघांनी 11 धावा चोपल्या. पण, राजिथाने 15 चेंडूंत 23 धावा कुटणार्या झाद्रानला बाद केले. बदली खेळाडू मदी हेमंथाने अविश्वसनीय झेल घेतला. यावेळी 7 चेंडूंत 15 धावा हव्या होत्या आणि राशीदवर सर्व मदार होती. चेंडू वेलालगेच्या हाती सोपवला. त्याचे पहिले दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर राशीदने 4,0,4,4 असे फटके मारले. त्यांना 1 चेंडूंत 3 धावा करायच्या असताना मुजीब झेलबाद झाला. पण, तरीही 37.2 षटकांत षटकार मारून त्यांना सुपर-4 मध्ये जाण्याची संधी होती. पण, त्यांनी तीही गमावली. तत्पूर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कुशल मेंडिसच्या 92 धावांच्या जोरावर 291 धावा केल्या.