पाकिस्‍तानकडून युक्रेनला शस्‍त्र पुरवठा! रशियाचे राजदूत म्‍हणाले, "याची आम्‍ही ..." | पुढारी

पाकिस्‍तानकडून युक्रेनला शस्‍त्र पुरवठा! रशियाचे राजदूत म्‍हणाले, "याची आम्‍ही ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानकडून युक्रेनला शस्‍त्र पुरवठा केला जात असल्‍याची माहिती समोर आली आहे. यावर भारतातील रशियाचे राजदूत ( Russian Ambassador ) डेनिस अलीपोव्‍ह यांनी रशियाची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

आम्‍ही याची गंभीर दखल घेतली आहे

‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेशी बोलताना डेनिस अलीपोव्‍ह म्‍हणाले की, पाकिस्‍तानकडून युक्रेनला शस्‍त्र पुरवठा होत असल्‍याचा अहवाल आणि माहिती समोर आली आहे. आम्‍ही ही माहिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. पाकिस्‍तानच्‍या या कृतीकडे आम्‍ही दुर्लक्ष करु शकत नाही. रशिया-युक्रेन लढाई सुरूच आहे. आम्ही सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाकडे पाहत आहोत. युक्रेनच्या बाजूने वारंवार म्हटलं गेले आहे की, त्यांना रशियाशी वाटाघाटी करण्यात स्वारस्य नाही. युक्रेनचे पाश्चात्य समर्थक युक्रेनला शस्त्रे आणि लष्करी उपकरणे पुरवत आहेत, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

Russian Ambassador : भारत-रशिया अणुऊर्जेतील सहकार्य यशस्वी

भारत-रशिया आर्थिक विकासावर आम्‍ही खूप समाधानी आहोत. दोन्‍ही देशांमधील व्यापार वाढत आहे. आम्ही विविध क्षेत्रात सहकार्य करत आहोत. अर्थव्यवस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध प्रगत क्षेत्रात संवाद कायम ठेवला आहे. अणुऊर्जेतील सहकार्य खूप यशस्वी झाले आहे. अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर या क्षेत्रात भारताला प्रत्यक्ष सहकार्य करणारा आम्ही एकमेव देश आहोत, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यापासून स्वतःला वेगळे ठेवू इच्छित नाही

आम्ही आमच्या बाजूने कधीही आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यापासून स्वतःला वेगळे ठेवू इच्छित नाही. आम्ही खुले आहोत, आम्हाला व्यवसाय करायचा आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेसोबतचा व्यवसाय सुरु ठेवायचा आहे.मात्र पाश्चात्य देश, आमचे पारंपारिक भागीदारांनी संबंध बिघडवायचे ठरवले आहे; पण माझा विश्वास आहे की, व्यापारी समुदाय, विविध पाश्चात्य कंपन्या तसे करत नाहीत, असा विश्‍वासही डेनिस अलीपोव्‍ह यांनी व्‍यक्‍त केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार का, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्‍याचा मला विशेषाधिकार नाही. G20 शिखर परिषदेत त्यांच्या सहभागाबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button