

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण जगाचे टेन्शन वाढविणार्या रशिया-युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धात दोन्ही देशांमधील हजारो जवानांनी प्राणाहुती दिली. हजारो महिला विधवा झाल्या. हजारो मातांनी आपल्या सुपुत्रांना गमावले. एका रिपोर्टनुसार, या युद्धामुळे जगातील सुमारे ३२ लाख कोटी रुपयांचा ($4 ट्रिलियन) चुराडा झाला आहे. सर्वाधिक आर्थिक फटका युक्रेनला बसला आहे. मागील वर्षभराच्या कालावधी या युद्धाला कलाटणी देणार्या प्रमुख घटनांविषयी जाणून घेवूयात.
२४ फेब्रुवारी २०२२ राेजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. मार्च २०२२ मध्ये रशियन सैन्याने युक्रेनमधील खेरसन शहर ताब्यात घेतले. या शहरात व्यापारी जहाजे, टँकर, कंटेनर जहाजे, आइसब्रेकर आणि जहाजे बनवली जातात. खेरसन हा रशियन सैन्याच्या ताब्यात असलेला पहिला प्रदेश बनला. यानंतर मे महिन्यात रशियन सैन्याने मारियुपोल शहरावर ताबा मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यात मारियुपोलमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर लोह आणि पोलाद वर्क्स प्लांटमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सलग काही दिवस मोठा संघर्ष झाला.
युक्रेनच्या सैन्याने ईशान्य युक्रेनमध्ये खार्किव प्रदेशाच्या दिशेने अचानक प्रतिआक्रमण सुरू केले. या हल्ल्याला उत्तर देण्याऐवजी रशियन माघार घेऊ लागल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जावू लागले.
ऑक्टोबर २०२२ मध्ये रशियाला क्रिमियन द्वीपकल्पाशी जोडणारा १९ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि रेल्वे पूल उडवून दिला. स्फोटानंतर क्रिमियाच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या सात इंधन टाक्यांना आग लागली. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. पुलाचे दोन भाग अर्धवट कोसळले. यानंतर रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बफेक केली. बॉम्बस्फोटाचा उद्देश युक्रेनच्या वीज ग्रीड आणि पाणी साठवण सुविधा यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांना हानी पोहोचवणे हा होता.
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रशियाकडून अशी माहिती देण्यात आली होती की, रशिया-युक्रेन युद्ध ख्रिसमसच्या मध्यावरही थांबणार नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले होते की, नाताळपर्यंत रशियाने युक्रेनमधून आपले सैन्य बाहेर काढायला सुरुवात करावी, जे दोघांमधील शांततेसाठी उचललेले पहिले पाऊल असेल. मात्र, या महिन्यातही दोन्ही देशांमधील युद्ध सुरूच आहे.
संपूर्ण वर्षाचा विचार करता या युद्धात सर्वाधिक मनुष्यहानी मार्च २०२२ मध्ये झाली. या महिन्यात ३.२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला. नॉर्वेचे लष्कर प्रमुख जनरल ॲरिक क्रिस्टोफरसन याने म्हटलं आहे की, या युद्धात रशियाचे सुमारे १ लाख ८० हजार सैनिक ठार झाले. तर युक्रेनचे सुमारे १ लाख सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाचे २ लाखांहून अधिक सैनिक मारले गेले असावेत, असा अंदाज अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांतील काही अहवालांमध्ये नमूद केले आहे.
मागील एक वर्ष युक्रेनला अमेरिकेसह ३० हून अधिक देशांनी शस्त्रात्र पुरवठा केला आहे. अमेरिकेने युक्रेनला५६ लढाउ विमानांचा पुरवठा केला आहे. अमेरिका युक्रेनला ५० कोटी डॉलर किंमतीचे शस्त्र पुरवठा केला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने सुरुवातीपासूनच तटस्थ भूमिका घेतली आहे. सध्याचे युग हे युद्धाचे नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही देशांनी शांतता राखावी, चर्चेतून प्रश्न सोडवावा, असे आवाहन भारताच्या वतीने वारंवार करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता या काळात भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरुच ठेवली आहे. डिसेंबर २०२२ पासून भारताने रशियाकडून कच्चे तेल आयातीमध्ये वाढ केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यास चार दिवसांचा कालावधी असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला आकस्मिक भेट दिली. २० फेब्रुवारी राजी त्यांनी त्यांची ही भेट रशियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आम्ही युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, यापुढे जेव्हा युक्रेनला मदत लागेल तेव्हा सर्वात आधी अमेरिका करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
हेही वाचा :