धोकादायक! दुर्मिळ मांस खाणाऱ्या ‘बॅक्टेरिया’मुळे तिघांचा मृत्‍यू, न्यूयॉर्कमध्ये चिंता वाढली | पुढारी

धोकादायक! दुर्मिळ मांस खाणाऱ्या 'बॅक्टेरिया'मुळे तिघांचा मृत्‍यू, न्यूयॉर्कमध्ये चिंता वाढली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खार्‍या पाण्‍यात किंवा कच्‍च्‍या शेलफिशमध्‍ये आढळणार्‍या दुर्मिळ मांस खाणार्‍या जीवाणूचा (बॅक्‍टेरिया) संसर्ग झाल्‍याने न्‍यूयॉर्कमध्‍ये तिघांचा मृत्‍यू झाला आहे. या तिघांनाही मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती कनेक्टिकटच्‍या आरोग्‍य विभागाचे डायरेक्‍टर क्रिस्‍टोफर बॉयल यांनी दिल्‍याचे वृत्त न्‍यू यॉर्क टाइम्‍सने दिले आहे. दरम्‍यान, अमेरिकेमध्‍ये सीफूडमुळे मृत्यू होण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे.

कच्चे ऑयस्टर खाल्ल्यानंतर जुलैमध्ये तिघांना दुर्मिळ मांस खाणार्‍या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता. तिघेही ६० ते ८० वयोगटातील होते. अलीकडीलच लाँग आयलंडमध्ये मृत रुग्‍णांमध्‍ये देखील हा बॅक्टेरिया आढळला होता. न्यूयॉर्कमधील खार्‍या पाण्यात किंवा इतर ठिकाणी हा बॅक्‍टेरिया आढळला आहे का, याची तपासण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

आरोग्‍य विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

लोकांनी कच्च्या शिंपल्यांचे सेवन आणि खाऱ्या पाण्याच्या संपर्कात येण्याच्या संभाव्य धोक्याचा विचार केला पाहिजे आणि योग्य खबरदारी घ्यावी, असे आरोग्‍य विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. कनेक्टिकट आणि न्यूयॉर्कमधील अधिकारी लोकांना कच्चे ऑयस्टर खाण्यापूर्वी किंवा खारट किंवा खाऱ्या पाण्याच्या संपर्कात येण्यापूर्वी सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.

दुर्मिळ व्हायब्रिओ बॅक्टेरियाने दुर्दैवाने प्रदेशात प्रवेश केला आहे. ते धोकादायक ठरु शकतात. नागरिकांनी स्वतःसह आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनीही केले आहे.

काय आहे व्हायब्रिओ बॅक्टेरिया ?

कच्च्या शिंपल्यांचे सेवन आणि खाऱ्या पाण्याच्या संपर्कात व्हायब्रिओ बॅक्टेरियाचा संसर्ग होण्‍याचा धोका असतो. याचा संसर्ग झाल्‍यास त्वचेवर जखमा, व्रण आणि फोड येऊ शकतात. थंडी वाजणे, ताप, अतिसार, पोटदुखी आणि उलट्या असा त्रास सुरु होतो. हा बॅक्‍टेरिया रुग्‍णाचे मांस खातो. त्‍याला आतून पोखरतो. बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

हेही वाचा : 

Back to top button