Chandrayan 3 Updates | चांद्रयान-३ चा महत्त्वपूर्ण टप्पा पार, ‘लँडर-प्रॉपल्शन मॉड्यूल’ झाले वेगळे; आता लँडिगचे वेध | पुढारी

Chandrayan 3 Updates | चांद्रयान-३ चा महत्त्वपूर्ण टप्पा पार, 'लँडर-प्रॉपल्शन मॉड्यूल' झाले वेगळे; आता लँडिगचे वेध

पुढारी ऑनलाईन : चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश बनण्याच्या जवळ पोहोचला आहे. ३४ दिवसांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-३ चे (Chandrayan 3 Updates) आज (दि.१७) प्रॉपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे झाले. बुधवारी अखेरच्या कक्षेत नेण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर इस्रोची गुरुवारी लँडर वेगळे करण्यासाठीची आणखी एक युक्ती यशस्वी ठरली. इस्रोने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आता २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर यानाचे लँडिंग होईल. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे.

‘राइडसाठी धन्यवाद, मित्रा! असे लँडर मॉड्यूल (एलएम) म्हणाले. लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम) पासून यशस्वीरित्या वेगळे केले आहे. लँडर मॉड्यूल उद्या सुमारे सायंकाळी ४ वाजता नियोजित डीबूस्टिंगवर किंचित कमी कक्षेत उतरण्यासाठी सेट केले आहे.” असे इस्त्रोने ट्विट करत म्हटले आहे.

विक्रम (लँडर) आणि प्रज्ञान (रोव्हर) यांचा समावेश असलेले लँडिंग मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले. चांद्रयान-३ ने आता सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. आता चांद्रयान-३ ला लँडिंगचे वेध लागले आहेत.

‘इस्रो’कडून काल बुधवारी (दि.१६) चौथ्यांदा चांद्रयान-३ ची चंद्राभोवतीची कक्षा बदलण्यात आली होती. यानाने त्यानंतर आता चंद्राच्या १५३ कि.मी. x १६३ किमीच्या अगदी जवळच्या वर्तुळाकार कक्षेत प्रवेश केला होता. कक्षांतरासाठी काल सकाळी साडेआठच्या सुमारास ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी काही काळ इंजिन फायर केले होते. यापूर्वी चांद्रयान १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत होते. त्यानंतर यान चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत पोहोचले होते. (Chandrayan 3)

इस्रोने चांद्रयान-३ ला १५३ किमी x १६३ किमी कक्षेत ठेवण्याची युक्ती बुधवारी पहाटे यशस्वीरित्या पूर्ण केली, ज्यात विक्रम (लँडर) आणि प्रज्ञान (रोव्हर) यांचा समावेश असलेल्या लँडिंग मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली होती.

आता केवळ सहा दिवस बाकी

चांद्रयान -३ ला बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे. यासाठी सहा दिवस बाकी आहेत. डी-बूस्ट मॅन्युव्हर्स अखेरीस विक्रम लँडरला एका कक्षेत ठेवतील जिथे पेरील्यून (चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू) ३० किमीवर आहे आणि अपोलून (चंद्रापासून सर्वात दूरचा बिंदू) १०० किमी आहे. या कक्षेतून अंतिम लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे. ३० किमी x १०० किमी परिभ्रमण पूर्ण झाले की, लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत कमी करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी याआधी सांगितले होते. (Chandrayan 3 Updates)

चांद्रयान-३ च्‍या अंतराळ प्रवासाला ३४ दिवस पूर्ण

चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. बुधवारी (दि.१६) चांद्रयान-३ च्‍या अंतराळ प्रवासाला ३४ दिवस पूर्ण झाले आहेत. आता चांद्रयान-३ ला चंद्राच्या पृष्ठाभागावर उतरण्याचे वेध लागले आहेत. (Chandrayaan-3 Mission)

हे ही वाचा ;

Back to top button