Cargo Ship Fire : नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजाला आग; एका भारतीयाचा मृत्यू; जहाज बुडण्याची भीती | पुढारी

Cargo Ship Fire : नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजाला आग; एका भारतीयाचा मृत्यू; जहाज बुडण्याची भीती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cargo Ship Fire : नेदरलँडच्या किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. तसेच जहाज बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेत जीव गमावलेल्या भारतीय व्यक्ती या जहाजाच्या क्रू चा सदस्य होता. दरम्यान, नेदरलँड्सच्या तटरक्षक दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले असून ही आग विझवण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात, असा इशारा दिला आहे. हे मालवाहू जहाज तीन हजार कार वाहून नेत होता.

Cargo Ship Fire : दुर्घटनाग्रस्त ‘फर्मेंटल हाइवे जहाज’ पनामाचे

हे दुर्घटनाग्रस्त जहाज पनामा येथील असून याची लांबी 199 मीटर इतकी आहे. या जहाजाचे नाव ‘फर्मेंटल हायवे’ (Fremantle Highway) असे असून हे जहाज जर्मनी ते मिश्र असा प्रवास करत होते. नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ असताना मंगळवारी रात्री उशिरा या जहाजाला आग लागली. या दुर्घटनेत जहाजाचा क्रू मेंबर जो एक भारतीय होता त्याचा मृत्यू झाला आहे. नेदरलँड्सच्या भारतीय दुतावासाने याविषयी माहिती दिली. दुतावासने म्हटले आहे की, ते मयताच्या कुटुंबीयाच्या संपर्कात आहे आणि लवकरच त्याचे पार्थिव भारतात पाठविण्यात येईल. तसेच घटनेत जे 20 जण जखमी झाले आहेत त्यांच्याही ते संपर्कात आहेत. त्यांना मालवाहू जहाजाच्या कंपनीकडून सर्व आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

Cargo Ship Fire : आग लागण्याचे कारण काय

डच बेट एमलँडपासून 27 किमी अंतरावर असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ‘द वेडन सी’जवळ हा अपघात झाल्याचे अहवालात सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. अपघाताच्या छायाचित्रांमध्ये जहाजातून धूर निघताना दिसत आहे.

आग लागण्याच्या कारणाबद्दल खात्रीशीर माहिती अद्याप सांगता येत नाही. मात्र, एका अंदाजानुसार मालवाहू जहाजाने वाहून नेल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एका कारला सुरुवातीला आग लागली असावी. नंतर ही आग पसरत जाऊन तिने उग्र रूप धारण केले. अग्निशमन विभागाचे जवान आग विझवण्यात गुंतले आहेत, मात्र, 16 तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

Cargo Ship Fire : जहाज बुडण्याची भीती

अग्निशमन दलाच्या जवानांच्या माहितीनुसार, आग विझवण्यात अनेक दिवस लागू शकतात. कारण अग्निशमन दलाचे जवान सध्या जहाजावर चढण्यात असमर्थ आहेत. त्यामुळे सध्या फक्त मशिनींच्या मदतीने पाणीद्वारा आग विझवण्यात येत आहे. तसेच यावेळी त्यांनी जहाजात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने याच्या बुडण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे जहाजावरील आग विझवणे हे प्रचंड आव्हानाचे ठरत आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button