बांगलादेश : ३ मजली जहाजाला भीषण आग, ३९ जणांचा मृत्यू - पुढारी

बांगलादेश : ३ मजली जहाजाला भीषण आग, ३९ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

बांगलादेशातील झलकाठी येथे एका तीन मजली जहाजाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. शुक्रवारी (२४ डिसेंबर २०२१) सुगंधा नदीत या जहाजाला आग लागून त्यामध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे २०० हून अधिक लोक भाजून जखमी झाल्याचे बोलले जात आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. आग एवढी भीषण होती की, ‘माय अभिजन’ हे तीन मजली जहाज आगीत भस्मसात झाली.

याबाबत झलकाठी जिल्ह्याचे अतिरिक्त आयुक्त मोहम्मद नजमुल आलम यांनी सांगितले की, जहाजावर सुमारे १००० लोक होते. ही फेरी राजधानी ढाका येथून बरगुना जिल्ह्यात जात होती.

अग्निशमन सेवेचे उपसंचालक कमाल हुसैन भुईया यांनी सांगितले की, या आगीत जखमी झालेल्या ७० हून अधिक लोकांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार “अनेक लोक या आगीत मृत्यूमुखी पडले तर अनेकांनी नदीत उड्या मारल्याने ते बुडाले.

या अपघातातून बचावलेल्या सैदुर रहमान यांनी सांगितले की, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास इंजिन रुममध्ये मोठी आग लागली. त्यानंतीर ती आग इतर ठिकाणी वेगाने पसरली. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या, त्यापैकी काहींना किनारा गाठण्यात यश आले. रहमानच्या म्हणण्यानुसार, तोही जळण्याचा वास घेऊन आपल्या व्हीआयपी केबिनमधून बाहेर आला आणि पत्नी आणि मेव्हण्यासह थंड पाण्यात उडी मारून किना-यावर पोहून गेला.

वर्षातली तिसरी मोठी घटना

बांगलादेशात या वर्षी जुलैच्या सुरुवातीला रूपगंज या औद्योगिक शहरामध्ये अन्न आणि पेय कारखान्याला लागलेल्या आगीत ५२ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये एक बोट वाळूने भरलेल्या मालवाहू जहाजासह तलावात घुसल्याने २० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या जहाजाला आग लागल्याची ही तीसरी मोठी घटना आहे.

हेही वाचा

Back to top button