पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे मालक एलॉन मस्क लवकरच ट्विटरचा लोगो म्हणजेच पक्ष्याचा लोगो हटवणार आहेत. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क एकापाठोपाठ एक नवीन बदल करत आहेत. नुकतेच मस्क यांनी ट्विटरवर डायरेक्ट मेसेजिंगसाठी देखील पैसे द्यावे लागतील असे सांगितले आहे. त्यानंतर आता त्यांनी नवीन बदलाचे संकेत दिले आहेत. "लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ," असे मस्क यांनी ट्विट केले आहे.
सध्या ट्विटर आयकॉनिक ब्लू बर्ड लोगोद्वारे दर्शविले जाते. या लोगोमध्ये बदल करण्याचे संकेत एलॉन मस्क यांनी दिले आहेत. मस्क यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, जर आज रात्री एक छान असा 'X' लोगो पोस्ट केला गेला, तर आम्ही तो उद्या जगभरात लाइव्ह करू. लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ. मस्क यांनी अलीकडेच त्यांची नवीन AI कंपनी 'xAI' लाँच केली आहे. यानंतर त्यांनी ट्विटरबाबत ही घोषणा केली आहे.
मस्क यांनी त्यांच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये 'X'समाविष्ट केले आहे. नुकत्याच लाँच झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे नाव देखील 'xAI' आहे. तसेच स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील SpaceX असे बनवले आहे. आता ट्विटरचा लोगो 'X'मध्ये बदलण्यात येणार आहे. नवीन लोगो सध्याच्या लोगो सारखाच असेल पण त्यामध्ये 'X'असणार आहे, असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
'ट्विटर ब्लू' ही कंपनीची फी आधारित सेवा आहे, जी अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. ट्विटर ब्लू अंतर्गत, युजर्सना ब्लू टिक मिळते. यासाठी त्यांना दर महिन्याला निश्चित शुल्क भरावे लागते. ट्विटर ब्लू टिकनंतर आता मस्क इतर अनेक फीचर्स बनवत आहेत. आता ट्विटरवर डायरेक्ट मेसेजिंगसाठी देखील पैसे द्यावे लागतील, असे मस्क यांनी म्हटले आहे. म्हणजेच तुम्ही ट्विटर ब्लूची सेवा घेतली नसेल तर तुम्ही कोणालाही मेसेज करू शकणार नाही.
हेही वाचा :