पुढारी ऑनलाईन डेस्क : कुस्ती म्हटलं की, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ( Khashaba Dadasaheb Jadhav ) यांचे स्मरण हाेतेच. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणार्या खाशाबा जाधव यांची आज जयंती. १९५२ मध्ये फिनलॅंड देशातील हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्ती खेळातील कांस्य पदकावर मोहर उमटवली आणि स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक पदक २३ जुलै रोजी म्हणजे आजच्याच दिवशी मिळवून दिलं आणि भारताच्या मानात शिरपेच रोवला. पण तुम्हाला माहीत आहे का? ज्या दिवशी ही स्पर्धा झाली तेव्हा ते इतरांची कुस्ती पाहायला गेले होते. त्या दिवशी ते कुस्ती खेळणार आहे हे माहितीच नव्हतं. अचानक नाव पुकारलं आणि इतिहास घडला. जाणून घ्या पुढील किस्सा. (Khashaba Dadasaheb Jadhav)
खाशाबा जाधव यांचा जन्म दि. 15 जानेवारी 1926 रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे झाला. खाशाबा यांना एकूण ७ भावंडे. त्यांच्या आजोबांना कुस्तीचं वेड होतं. खाशाबांचे वडील दादासाहेबही त्या परिसरातील ख्यातनाम, असे पैलवान होते. खाशाबांच्या घरची परिस्थिती बेताची. त्यांना वडिलांकडून कुस्तीचे बाळकडू मिळाले. वडील दादासाहेब त्यांना घरातच कुस्तीचे शिक्षण देऊ लागले. मुलतानी डावावर चीत करणारा पहिलवान अशी खाशाबांची ख्याती आजूबाजूच्या परिसरात झाली होती. खाशाबा फक्त कुस्तीतच पारंगत नव्हते तर मल्लखांब, हातोडीफेक, वेटलिफ्टींगमध्येही त्यांचा हातखंडा होता. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गोळेश्वरजवळील रेठरे गावच्या जत्रेत सर्वप्रथम कुस्ती जिंकली. त्यांना बक्षीस म्हणून चक्क साखरेच्या बदामाचा खाऊ दिला होता. त्यानंतर टिळक हायस्कूलमध्ये त्यांना कुस्तीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण क्रीडाशिक्षक गुंडोपंत बेलापुरे व मुख्याध्यापक बाबूराव वळवडे यांनी दिले.
मॅट्रिकनंतर त्यांना कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरचे वेध लागले. वडिलांनी आपली शेतजमीन गहाण ठेवून खाशाबांना राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीपंढरीत पाठवले. त्यांनी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. मराठा बोर्डींंगमध्ये राहायला गेले आणि आणि सुरू झाला ऑलिंपिक स्पर्धेचा प्रवास. या प्रवासात त्यांना क्रीडा शिक्षक गोविंद पुरंदरे यांच मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लंडनमधील १९४८ मध्ये हाेणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबा यांची निवड झाली. आर्थिक टंचाई होती. तरीही पैशांची जमवा-जमव केली. पैशाची अडचण दूर झाली; पण स्पर्धेच्या काही दिवस आधी त्यांना समजले की, मॅटवरील कुस्ती खेळायची आहे. सराव तर लाल मातीत सुरु हाेता. तरीही नाउमेद न होता त्यांनी सराव सुरु ठेवला. ऑलिंपिक स्पर्धेसाठी जिंकण्याची उमेद घेऊन लंडनला गेलेल्या खाशाबा (Khashaba D. Jadhav) यांच्या पदरी पहिल्या प्रयत्नात अपयश आले.
१९५२ मध्ये फिनलॅंड देशातील हेलसिंकी येथे हाेणार्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी अनेक अडचणीनंतर त्यांची निवड झाली. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसारखीच आर्थिक अडचण कायम हाेती. सराव सांभाळत खशाबा पै-पै करून 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे एक-एक रूपयापासून पैशांची जमवाजमव करू लागले. त्यांना विविध वर्गातून, लोकवर्गणीतून मदत होऊ लागली. घरच्या लोकांनी घरबांधणीसाठी साठवलेली पुंजीही दिली.
हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी फ्री स्टाईल बॉटमवेट (५७ किलो) या गटासाठी खाशाबा यांची निवड झाली होती. या गटात एकूण २४ स्पर्धक होते. २३ जुलै १९५२ दिवस उजाडला. खाशाबा संघाचे व्यवस्थापक प्रतापचंद दिवाण यांच्याकडे गेले आजच्या स्पर्धा किती वाजता हे विचारण्यासाठी. त्यावेळी त्यांनी आज सुट्टीचा दिवस आहे, असे सांगून खाशाबा यांना विश्रांती घ्यायला सांगितले. खाशाबा विश्रांती घेऊन पुन्हा कुस्ती सभागृहात इतर कुस्त्या पाहायला गेले. अचानक त्यांच्या नावाची घोषणा झाली; पण गडबडून न जाता ते स्पर्धेत उतरले. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी न आल्याने त्यांना बाय मिळाला. त्यानंतर खाशाबा यांनी एकएक करत कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांना चितपट केले. अशा त-हेने त्यांनी पाचही सामने जिंकले. खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात कांस्य पदकावर आपली माेहर उमटवत इतिहास घडवला. आणि अशा प्रकारे स्वतंत्र भारतात वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल ठरले.
पदक जिंकल्यानंतर खाशाबा भारतात परत आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी तब्बल १०१ बैलगाड्यांची जंगी मिरवणूक कराड ते गोळेश्र्वर या मार्गावर काढण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत, सत्कार करण्यात आले. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या खाशाबा जाधव यांनी आजच्याच दिवशी (२३ जुलै) भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून दिलं.