नवी दिल्ली ः वेअरेबल गॅझेटस् म्हणजेच शरीरावर परिधान करता येऊ शकतील अशी उपकरणे बनवणार्या एका कंपनीने आता एक 'स्मार्ट रिंग' सादर केली आहे. वरकरणी साधारण दिसणार्या या अंगठीत अद्ययावत फिटनेस फीचर्स आहेत. एखाद्या स्मार्ट वॉचप्रमाणे ही अंगठीही ती परिधान करणार्या व्यक्तीला त्याच्या आरोग्याविषयीची माहिती पाठवेल.
महिलांना या अंगठीमुळे मासिक पाळीच्या चक्राचे आपल्या स्मार्ट फोनवर नोटिफिकेशन मिळेल. याशिवाय ही अंगठी हृदयाचे ठोके आणि शरीराच्या तापमानाबाबतही माहिती देईल. ही अंगठी सेरेमिक आणि मेटलपासून बनवली आहे. वॉटर रेझिस्टंट म्हणजेच जलरोधक असणारी ही अंगठी परिधान करून व्यक्ती पाण्यात पोहू शकते. या अंगठीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामधील मेन्स्ट्रुअल ट्रॅकर. त्याच्या मदतीने महिलांना मासिकचक्राला ट्रॅक करता येईल. नोटिफिकेशन आणि रिमाइंडरच्या माध्यमातून त्याविषयीची माहिती महिला यूजर्सना मिळू शकेल.
शिवाय ही अंगठी दैनंदिन शारीरिक हालचालींनाही ट्रॅक करते. दिवसभरात आपण किती पावले चाललो, किती अंतर चाललो, किती कॅलरीज बर्न केल्या याची माहितीही ही अंगठी देईल. या अंगठीत हार्ट रेट सेन्सरही आहे. नेहमीची कामे करत असताना तसेच व्यायाम करीत असतानाही ही अंगठी हृदयाच्या ठोक्यांची माहिती देईल. शरीरात होणारे बदल टिपून हे बदल पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह याची माहितीही ही अंगठी देऊ शकते. शिवाय शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण तसेच झोपेविषयीची माहितीही या अंगठीच्या सहाय्याने मिळू शकेल.