PM Modi Visit USA : 80 कोटी डॉलर्सचा सेमीकंडक्टर, लढाऊ जेट इंजिननिर्मिती प्रकल्प भारतात | पुढारी

PM Modi Visit USA : 80 कोटी डॉलर्सचा सेमीकंडक्टर, लढाऊ जेट इंजिननिर्मिती प्रकल्प भारतात

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Visit USA) वॉशिंग्टनमध्ये असताना महत्त्वपूर्ण करार प्रत्यक्षात येत असून मायक्रॉन या सेमीकंडक्टर बनवणार्‍या कंपनीने भारतात 80 कोटी डॉलर्सचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीई एअरोस्पेसच्या माध्यमातून भारतात एफ 414 फायटर जेट इंजिन निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. तसेच अमेरिकेने भारतात बंगळूर आणि आणखी एका शहरात वकिलात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर तिकडे नासाच्या चांद्र मोहिमेत भारताच्या इस्रोला सहभागी करून घेण्याबाबतही करार झाला आहे. आता भारताचे अमेरिकेसोबत ‘मिशन स्पेस’ संयुक्तपणे सुरू होत आहे. (PM Modi Visit USA)

पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चेनंतर करार होण्याआधीच भारतासाठी चांगली वार्ता आली असून काही महत्त्वाचे करार-मदार तेथे पार पडले.

सध्या भारताच्या वाहन उद्योगाला भेडसावडणार्‍या सेमी कंडक्टर चीपच्या तुटवड्यापासून दिलासा देणारी बातमी पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यात मिळाली आहे. वाहन निर्मितीसह अनेक गोष्टींत आवश्यक असणार्‍या सेमीकंडक्टर चीपच्या उपलब्धतेबाबत सारे जग चिंतेत असताना चीनला बाजूला सारत भारत सेमीकंडक्टर निर्मितीत पुढे आला आहे. वॉशिंग्टनमध्ये आल्या आल्या पंतप्रधान मोदी यांनी मायक्रॉन सेमीकंडक्टर चीप बनवणार्‍या विख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय मेहरोत्रा यांची भेट घेतली. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी मायक्रॉन टेक्नॉलॉजीला पंतप्रधानांनी आमंत्रित केले. सेमीकंडक्टर पुरवठा साखळीच्या विविध भागांमध्ये भारत स्पर्धात्मक फायदे देऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. यानंतर काही वेळातच मायक्रॉनने भारतात प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. मायक्रॉन भारतात 80 कोटी डॉलर्स ग्ाुंतवणूक करून सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार आहे.

अप्लाईड मटेरियल्सचे डिकरसन यांचीही भेट (PM Modi Visit USA)

पंतप्रधान मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अप्लाईड मटेरियल्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गॅरी ई. डिकरसन यांचीही भेट घेतली. भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट करण्यासाठी योगदान देण्याकरिता अप्लाईड मटेरियल्सला पंतप्रधानांनी आमंत्रित केले. भारतातील प्रक्रिया तंत्रज्ञान आणि प्रगत पॅकेजिंग क्षमतांच्या विकासासाठीही अप्लाईड मटेरियल्सला पंतप्रधानांनी आवाहन केले. पंतप्रधान आणि डिकरसन यांनी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी भारतातील शैक्षणिक संस्थांसोबत अप्लाईड मटेरियल्सच्या सहकार्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली.

जेट इंजिन निर्मितीचा करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्स कल्प, ज्युनिअर यांची भेट घेतली. भारतात दीर्घकालीन उत्पादन करण्याच्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधानांनी जनरल इलेक्ट्रिकचे कौतुक केले. भारतातल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान आणि कल्प, ज्युनिअर यांनी जनरल इलेक्ट्रिकच्या प्रगत तंत्रज्ञान सहयोगावर चर्चा केली. भारतातल्या विमान वाहतूक आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यासाठी पंतप्रधानांनी जनरल इलेक्ट्रिकला आमंत्रित केले. यानंतर लगेच जीई एअरोस्पेससोबत भारतात एफ 414 फायटर जेट इंजिन तयार करण्याचा करार करण्यात आला. जीई हा प्रकल्प हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबत राबवणार आहे.

तेजस विमानासाठी वापर 

जीईसोबतचा करार भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या करारामुळे भारताला देशातच तयार करण्यात आलेल्या तेजस या कमी वजनाच्या लढाऊ विमानाच्या दुसर्‍या पिढीतील विमानांची निर्मिती करता येणार आहे. जीई एअरोस्पेसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात या कराराची माहिती देताना म्हटले आहे की, हा करार मूर्त रूपात येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. कंपनीच्या या इंजिनांच्या जोरावर भारताच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या कामगिरीत मोठा फरक पडेल.

नासा आणि इस्रो यांच्यात करार (PM Modi Visit USA)

भारत अमेरिकेच्या आर्टीमस या चांद्रमोहिमेत सहभागी होणार आहे. नासा आणि इस्रो यांच्यात झालेल्या करारानुसार 2024 च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेत भारत सहभागी होणार आहे. अंतराळ क्षेत्रात दोन देशांतील सहकार्य वृद्धिंगत करणार्‍या आर्टेमिस करारावर लवकरच सह्या होणार आहेत.

हेही वाचा; 

Back to top button