

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज (दि.२२ जून) वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच. लॉरेन्स कल्प ज्युनियर यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमेरिकन जनरल इलेक्ट्रॉनिककडून (GE) जेट इंजिनांबाबतच्या करारासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. यापुढे भारतातील F414 जेट विमानासाठी लागणारे इंजिन हे अमेरिकन कंपनीच्या मदतीने भारतातच बनवले जाणार आहे.
अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रॉनिक (GE) आणि हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या मध्ये या ऐतिहासिक कराराची घोषणा कऱण्यात आली आहे. यानुसार, भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांसाठी लागणारे F414 जेट इंजिन यापुढे भारतातच तयार करण्यात येणार आहे. या करारानुसार जेट इंजिन अमेरिकेतील जेई एरोस्पेस आणि भारतातील एचएएल या कंपन्या एकत्रितरित्या बनवणार आहेत. हा भारतीय हवाई दलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) Mk2 कार्यक्रमाचा भाग (Fighter Jet Engines) असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या करारानंतर अमेरिकेच्या GE एरोस्पेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएस दौऱ्यातील लढाऊ F414 जेट विमान इंजिन संदर्भातील हा महत्त्वाचा सामंजस्य करार आहे. यामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य (Fighter Jet Engines) मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे देखील जनरल इलेक्ट्रिकने म्हटले आहे.