Amazon Jungle Plane Crash | हा तर चमत्कारच! बेपत्ता ४ मुले ४० दिवसांनी सापडली ॲमेझॉनच्या रहस्यमय जंगलात | पुढारी

Amazon Jungle Plane Crash | हा तर चमत्कारच! बेपत्ता ४ मुले ४० दिवसांनी सापडली ॲमेझॉनच्या रहस्यमय जंगलात

पुढारी ऑनलाईन : ॲमेझॉन हे जगातील सर्वात मोठे घनदाट जंगल आहे. हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या या रहस्यमय जंगलात जिवंत राहणे सोपे नाही. पण कोलंबियाच्या ॲमेझॉन जंगलात विमान कोसळल्यानंतर ४० दिवसांनी चार मुले जिवंत सापडली आहेत. हा एक चमत्कारच आहे, अशी भावना कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (Colombia President Gustavo Petro) यांनी व्यक्त केली आहे. (Amazon Jungle Plane Crash)

१ मे रोजी एका छोट्या विमानाला अपघात झाला होता. तेव्हा विमानात तेरा, नऊ, चार वर्ष वयाची आणि एक वर्षाचे बाळ तसेच त्यांची आई, वैमानिक आणि सह-वैमानिक होते. या मुलांची आई आणि विमानातील इतरांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातस्थळी केवळ तिघांचे मृतदेह सापडले होते. पण मुलांचा काही पत्ता लागला नव्हता. अनेक आठवडे शोध घेतल्यानंतर यातील ४ मुले सापडली आहेत. हा तर चमत्कार असून संपूर्ण देशासाठी ही आनंदांची गोष्ट असल्याचे गुस्तावो पेट्रो यांनी म्हटले आहे. त्यांना या दिवसाला “मॅजिकल डे” असे ​​म्हटले आहे. “ते सर्व एकटे होते, त्यांचे यातून वाचून जिवंत राहणे ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (Colombia plane crash)

पीस ऑफ चिल्ड्रन

“ही मुले आज पीस ऑफ चिल्ड्रन आणि चिल्ड्रन ऑफ कोलंबिया आहेत.” असेही त्यांनी नमूद केले आहे. पेट्रो यांनी ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४ मुलांची काळजी घेत असलेल्या लष्करी आणि स्थानिक समुदायातील सदस्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या मुलांच्या आरोग्यकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आपण त्यांच्या आजोबांशी बोललो असून त्यांनी “वनमातेच्या कृपेनेच ती आम्हाला परत मिळाली आहेत” अशीही भावना व्यक्त केली आहे. (Amazon Jungle Plane Crash)

त्यानंतर मुलांना कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे नेण्यात आले. तेथे त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत आले.

आईचा मृत्यू

सेस्ना २०६ या विमानातून चार मुले आणि त्यांची आई प्रवास करत होती. हे विमान ॲमेझॉनास प्रांतातील अराराक्वारा येथून सॅन जोसे डेल ग्वाविअरेकडे जात होते. या दरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर हे विमान कोसळले होते. त्यानंतर अपघातस्थळी लष्कराला तिघांचे मृतदेह सापडले होते.

अपघातानंतर अशी करुन घेतली सुटका

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांनी अपघातग्रस्त विमानातून सुटका करुन घेतली आणि मदतीसाठी त्यांनी रेनफॉरेस्टच्या दिशेने धाव घेतली. या अपघातानंतर मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. या दरम्यान मे महिन्यात बचावकर्त्यांना मुलांच्या काही वस्तू सापडल्या होत्या. ज्यात मुलांची पाणी पिण्याची बाटली, कात्री, केस बांधण्याची क्लिप आणि मेकशिफ्ट शेल्टर यांचा समावेश होता. जंगलात लहान मुलांच्या पावलांचे ठसेदेखील सापडले होते. ज्यामुळे शोध पथकांना ते अपघातातून बचावले असल्याची खात्री पटली होती.

रहस्यमय ॲमेझॉन जंगल

विशेष म्हणजे ही मुले ४० दिवस ॲमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये जिवंत राहिली. या जंगलात मोठ्या प्रमाणात जॅग्वार, साप आणि इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. ही मुले हुइटोटो या स्थानिक जमातीतील आहेत आणि त्यांच्या समुदायातील सदस्यांना आशा आहे की त्यांचे फळांच्या बाबतीत असलेले ज्ञान आणि जंगलात जगण्याची त्यांची कौशल्ये याची त्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी मदत होईल.

आजीच्या आवाजातून दिली मुलांना हाक

स्थानिक लोकांनी या शोध मोहिमेत मदत केली आणि हेलिकॉप्टरमधून मुलांच्या आजीचा संदेश प्रसारित केला होता. हा संदेश हुइटोटो भाषेत रेकॉर्ड केला गेला आणि त्यांचा ठिवठिकाणी सापडावा यासाठी त्यांना आहे त्या ठिकाणी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हे ही वाचा :

Back to top button