Imran Khan Arrest update : पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या घरावर इम्रान खान समर्थकांचा हल्ला  | पुढारी

Imran Khan Arrest update : पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या घरावर इम्रान खान समर्थकांचा हल्ला 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घरावर हल्ला केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.११) पहाटे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या ५०० हून अधिक लोक पंतप्रधानांच्या मॉडेल टाऊन लाहोर निवासस्थानी पोहोचले आणि तेथे उभी असलेली वाहने जाळली. (Imran Khan Arrest update)

इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. इम्रान खान समर्थक कमालीचे आक्रमक बनले असून, ते सर्वत्र जाळपोळ करत सुटले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्ला केला. ‘आयएसआय’च्या परिसरात जाळपोळ केली. (Imran Khan Arrest update)

Imran Khan Arrest update : पंतप्रधानांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले

पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी (दि.११) पीटीआयला सांगितले की, “त्यांनी पंतप्रधानांच्या घरात पेट्रोल बॉम्बही फेकले. ज्यावेळी हल्लेखोरांनी हल्ला केला त्यावेळी पंतप्रधानांच्या घरी फक्त सुरक्षा रक्षकच उपस्थित होते. त्यांनी तेथील पोलिस चौकीही पेटवून दिली.पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहोचताच पीटीआयचे आंदोलक निघून गेले. पुढे ते असेही म्हणाले की,  पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वी, जमावाने मॉडेल टाऊनमधील सत्ताधारी पीएमएल-एन सचिवालयावर हल्ला केला आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली.

इम्रान खान यांच्या समर्थकांनी  मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत पंजाबमध्ये १४ सरकारी इमारती आणि २१ पोलिस वाहनांना आग लावली. इम्रान खान यांचे समर्थक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हिंसक चकमकींमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये अंदाजे सातजण ठार झाले आहेत  आणि सुमारे ३०० लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button