Russia Ukraine War : तुर्कीच्या शिखर परिषदेत युक्रेनच्या खासदाराने रशियाच्या खासदाराचे फोडले थोबाड | पुढारी

Russia Ukraine War : तुर्कीच्या शिखर परिषदेत युक्रेनच्या खासदाराने रशियाच्या खासदाराचे फोडले थोबाड

अंकारा; पुढारी ऑनलाईन : गेल्या १५ महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे आणि याची धग अनेकांपर्यंत पोहचली आहे. तुर्कीमध्ये एक शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत युक्रेनच्या एका खासदाराने रशियाच्या खासदाराचे थोबाड फोडले आणि त्यास धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वच सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. ही घटना तुर्कस्तानची राजधानी अंकरा येथे गुरुवारी (दि.५) घडली. (Russia Ukraine War)

तुर्कस्तानची अधिकृत वृत्तसंस्था Anadolu Agency एजन्सीनुसार, ही घटना गुरुवारी ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या (PABSEC) संसदीय असेंब्लीच्या ६१ व्या आमसभेदरम्यान घडली. या परिषदेत आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक स्तरावर बहुपक्षीय आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने काळ्या समुद्र क्षेत्रातील देश एकत्र आले होते. (Russia Ukraine War)

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कीव पोस्टचे विशेष पत्रकार आणि राजकीय सल्लागार जेसन जे स्मार्ट यांनी पोस्ट केला होता. हा व्हिडिओ ५३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

वकील इब्राहिम झेदान यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, “मार खाणारा प्रतिनिधी खरोखरच त्याच पात्रतेचा होता. अंकारा येथे झालेल्या परिषदेत रशियन खासदाराने युक्रेनच्या खासदाराकडून जबरदस्तीने ध्वज हिसकावून घेतला होता.”

युक्रेनचा ध्वज हिसकावल्याचा आरोप

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रशियन खासदार युक्रेनच्या खासदाराच्या हातून युक्रेनचा ध्वज हिसकावून घेताना दिसत आहे. कॉन्फरन्सदरम्यान युक्रेनचे खासदार मारिकोव्स्की यांनी आपल्या देशाचा ध्वज हातात घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, रशियन खासदाराने मारिकोव्स्कीकडून ध्वज जबरदस्तीने हिसकावून घेतला. हा झेंडा रशियन खासदाराकडून परत घेण्यासाठी युक्रेनचे खासदाराने रशियन खासदाराला चोप दिला आणि धक्काबुक्की केली. दरम्यान, सुरक्षा कर्मचारी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित युद्ध

दोन दिवसांपूर्वी, बुधवारीच रशियाने एक निवेदन प्रसिद्ध करून पुतीन यांच्या हत्येच्या प्रयत्नात क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्यात आले म्हटले होते. रशियाचे म्हणणे आहे की, ९ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडपूर्वी हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. प्रत्युत्तरादाखल रशियाने युक्रेनमधील खरसेन येथे जोरदार बॉम्बहल्ला केला.

युक्रेनने हल्ल्याचा करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला आहे. क्रेमलिनवरील या तथाकथित हल्ल्यांबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे प्रेस सेक्रेटरी म्हणाले होते.


अधिक वाचा :

Back to top button