धर्मांधतेचे विष! ब्रिटनमधील शाळांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर हिंदू विरोधी द्वेष : नवीन अहवालातील माहिती

धर्मांधतेचे विष! ब्रिटनमधील शाळांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर हिंदू विरोधी द्वेष : नवीन अहवालातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ब्रिटनमधील शाळांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर हिंदू विरोधी द्वेष पसरविण्‍याचे काम सुरु आहे, अशी
धक्‍कादायक माहिती ब्रिटनमधील एका संस्‍थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. हिंदूना इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यासाठी त्रास देण्‍याबरोबर विविध घटनांचा उल्‍लेखही या अहवालात करण्‍यात आला आहे.

हिंदू विद्यार्थ्यांनी करावा लागतो धार्मिक भेदभावाचा सामना

ब्रिटनमधील हेन्री जॅक्सन सोसायटी या संस्‍थेच्या वतीने अरब आणि इस्‍लामिक स्‍टडीजमधील पीएचडी परीक्षार्थी शार्लोट लिटलवूड यांनी ९८८ पालकांच्‍या मुलाखती घेतल्‍या. यावर आधारित आपल्‍या अहवालात त्‍यांनी म्‍हटले आहे की, "ब्रिटनमधील शाळांमधील धार्मिक मतांबाबत सर्वेक्षण करण्‍यात आले. यावेळी हिंदू पालकांचेही मत जाणून घेतले. मुलाखत घेतलेल्‍या ५१ टक्‍के हिंदू पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना शाळेमध्‍ये हिंदू विरोधी द्वेषाचा सामना करावा लागला आहे. तसेच हिंदू धर्माचे विद्यार्थी असतील तर त्‍यांना शिक्षणाच्या बाबतीतही धार्मिकदृष्ट्या भेदभाव केला जातो."

अहवालाने महत्त्‍वाच्‍या मुद्याकडे वेधले लक्ष

या अहवालाच्‍या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना खासदार संदीप वर्मा म्‍हणाले की, या अहवालाने एक महत्त्‍वाच्‍या मुद्‍याकडे लक्ष वेधले आहे. धार्मिक भेदभावामुळे आमची मुलं शाळेत जायलाच घाबरत असतील तर ही खूपच गंभीर बाब आहे.

शिक्षकांकडून समस्‍या दडपण्‍याचा प्रयत्‍न

यावेळी या अहवालाच्‍या लेखिका शार्लोट लिटलवूड यांनी सांगितले की, मागील वर्षी दुबई येथे झालेल्या आशिया क्रिकेट चषक स्‍पर्धेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला होता. यानंतर लीसेस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचार झाला. यानंतर आम्‍ही शाळातील धार्मिक वातावरणावर विश्लेषण केले. आम्हाला आढळले की, शिक्षक या समस्‍याच दडपण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. ठिकाणी हिंदू धर्माबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे."

शाकाहारी असलेल्‍या विद्यार्थ्यांची खिल्‍ली उडवणे आणि देवतांचा अपमान करणे

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदू धर्माच्‍या विद्यार्थ्यांना अपमानास्‍पद वागणूक मिळाल्‍याची अनेक उदाहरणे आहेत. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्‍यांची खिल्‍ली उडवली जाते. तसेच हिंदू देवतांचा अपमान करणे, असेही प्रकार घडतात, असेही या अहवालात म्हटले आहे.
एका विद्यार्थ्याला तीनवेळा शाळा बदलावी लागली. हिंदूना इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यासाठी त्रास देण्‍याबरोबर विविध घटनांचा उल्‍लेखही या अहवालात करण्‍यात आला आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्‍या १९ टक्के हिंदू पालकांनी असे म्‍हटले आहे की, ब्रिटनमधील शाळा हिंदूविरोधी द्वेष ओळखण्यात सक्षम आहेत. पालकांनी नोंदवलेल्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदू विरोधी टिप्‍पणीचा सामना करावा लागतो. काही मुले वर्षानुवर्षे अशा गुंडगिरीचा अनुभव घेत आहेत. पूर्व लंडनमधील एका विद्यार्थ्याला अशा गुंडगिरीमुळे तीन वेळा शाळा बदलावी लागली, असेही या सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले.

या अहवालात संपूर्ण ब्रिटनमधील विविध भागातील महाविद्यालयांमधील २२ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या घटनांची तपशीलवार माहिती दिली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी करण कटारिया यालाही शैक्षणिक प्रतिनिधी निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागला होता. लॉ स्कूलमध्ये शैक्षणिक प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्‍याने सरचिटणीसपदासाठीची निवडणूक लढवली. याच्‍या प्रचारादरम्यान हिंदू असल्याबद्दल माझ्याविरुद्ध मोहीम सुरू झाली, असे कटारिया याने सांगितले होते.

ब्रिटनमध्‍ये अशा प्रकारचा हा पहिलाचा अहवाल असल्‍याचा दावा केला जात आहे. आता यामधील शिफारशी शिक्षण सचिवांना सादर करण्‍यात येणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news