Ajit Pawar | अजित पवार यांच्याबाबत संभ्रमावस्था कायम, शिंदे-फडणवीस सरकार राहणार की… | पुढारी

Ajit Pawar | अजित पवार यांच्याबाबत संभ्रमावस्था कायम, शिंदे-फडणवीस सरकार राहणार की...

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी पक्ष फुटीच्या चर्चेला विराम दिला असताना अजूनही राजकीय संभ्रमावस्था कायम आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तर शरद पवारांनी देखील काही आमदारांशी चर्चा करून माहिती जाणून घेतल्याची चर्चा आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह भाजपसोबत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही अजित पवार घेतील त्या निर्णयात त्यांच्या सोबत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन बाळगल्याने त्यांची अजित पवार यांच्या निर्णयाला मूक संमती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करीत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तरीही अजित पवार काय करणार याबाबत संभ्रम कायम आहे. बुधवारी सकाळपासून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी भेटी घेतल्या. त्यात अजित पवारांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अजित पवार यांनी आपल्याबद्दल नाहक वावड्या उठविल्या जात असल्याचे त्यांना सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाचे काही नेते आणि आमदारांशी चर्चा करून पक्षातील हालचालींची माहिती घेतली. काही आमदारांनी पक्षात आपण अजित पवार यांचे निष्ठावान असल्याचे सांगत अजित पवार घेतील त्या निर्णयात आम्ही सोबत असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या पहिल्या बंडात अजित पवारांना असा उघड पाठिंबा मिळाला नव्हता. त्यामुळे पक्षात नेमके काय चाललेय, याची चाचपणी शरद पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फडणवीस यांच्या ट्विटची चर्चा

अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आल्याचे स्पष्ट केले असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत फायली क्लिअर करत असल्याचा फोटो प्रसिद्ध केला. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार राहणार की नवे समीकरण जुळून येणार याची बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. (Ajit Pawar)

Back to top button