Covid-19 updates | देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! २४ तासांत १२,५९१ नवे रुग्ण | पुढारी

Covid-19 updates | देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! २४ तासांत १२,५९१ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,५९१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ६५,२८६ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात १०,८२७ रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधीच्या दिवशी कोरोनाचे १०,५४२ नवे रुग्ण आढळून आले होते. (Covid-19 updates)

देशभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा यांनी बुधवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना उपजिल्हास्तरीय रुग्णालयांत पायाभूत सुविधा तयार ठेवण्याचा सल्ला दिला.

दिल्लीत चिंता वाढली, ६ मृत्यू

बुधवारी दिल्लीत कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला. तर १,७६७ रुग्ण आढळून आले होते. येथील पॉझिटिव्हिटी रेट २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी दिल्लीत १,५३७ रुग्णांची नोंद झाली होती. येथील सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांवर गेली आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कमी

कोरोना रुग्णवाढ आणि कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी काळजी करण्यासारखी स्थिती नाही, असे मत संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी व्यक्त केले आहे. कोव्हिड एन्डीमिक या स्थितीत आपण पोहोचलो आहोत. कोरोनाची चौथी लाट येईल असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. डॉ. गिलाडा यांनी म्हटले आहे , की सध्या झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस एक लाख रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. परंतु, तरीही मी कोरोनाच्या या वाढीला कोरोनाची लाट असे म्हणणार नाही. सध्या मृत्युमुखी पडत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण ६० वर्षांच्या वरचे आहेत.

तरीही सावध राहा….

तसेच कोमॉर्बिटीज, डायबिटिज, रेनल प्रॉब्लेम, कर्करोगाचे रुग्ण, केमोथेरेपी रुग्ण आणि क्षयरोग रुग्ण यांचे प्रमाण जास्त आहे. आपण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ किंवा घट नोंदविण्यात येईल. कोरोना एन्डीमिकची ही लक्षणे आहेत. गेल्या १६ महिन्यांमध्ये नवीन व्हेरायंट आढळून आलेला नाही. भविष्यात कोरोनाची मोठी लाट येईल, असे मला वाटत नाही. तरीही आपण सावध राहिले पाहिजे.

हे ही वाचा :

Back to top button