Walmart lay offs | ई-कॉमर्स उद्योगांत मोठी नोकरकपात, आता ‘या’ कंपनीकडून २ हजार जणांना नारळ! | पुढारी

Walmart lay offs | ई-कॉमर्स उद्योगांत मोठी नोकरकपात, आता 'या' कंपनीकडून २ हजार जणांना नारळ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्ट पाच ई-कॉमर्स पूर्तता केंद्रांमध्ये २ हजार कर्मचाऱ्यांची कपात (Walmart lay offs) करणार आहे. नियामक फाइलिंगमधील माहितीचा हवाला देत ब्लूमबर्गने याबाबतचे वृत्त दिले आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऑनलाइन खरेदीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी वॉलमार्टने त्यांचे ऑपरेशन सुरळीत करण्याची योजना आखली आहे. वॉलमार्टच्या नोकऱ्या कपातीच्या यादीत फोर्ट वर्थ, टेक्सासमधील सुमारे १ हजार पदे तसेच पेनसिल्व्हेनियामधील ६००, फ्लोरिडामधील ४०० आणि न्यू जर्सीमधील सुमारे २०० पदांचा समावेश आहे. आता वॉलमार्ट कॅलिफोर्नियामध्येही अतिरिक्त कपात करण्याची योजना आखत आहे. (Walmart lay offs)

गेल्या महिन्यात वॉलमार्टने अधिक तपशील न देता त्याच्या वेअरहाऊसेसमधील नोकरकपातीची पुष्टी केली होती. या कपातीमुळे वॉलमार्टमधील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. वॉलमार्टमधील नोकरकपात ही प्रतिस्पर्धी असलेल्या Amazon.com Inc. पेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. अमॅझॉनने आधीच १८ हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. आता आणखी ९ हजार जणांना कामावरुन काढून टाकण्याचे नियोजन केले आहे.

वॉलमार्ट इंक. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय रिटेल कॉर्पोरेशन कंपनी आहे. वॉलमार्टची अमेरिकेत हायपरमार्केट्स, डिस्काउंट डिपार्टमेंट स्टोअर्स आणि किराणा दुकानांची मोठी साखळी आहे.

टेक कंपन्यांत नोकरकपात

Google आणि Meta सारख्या इतर मोठ्या टेक कंपन्यांनीदेखील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. गुगलने या वर्षी जानेवारीमध्ये १२ हजार नोकरकपातीची घोषणा केली होती. तर मेटाने २१ हजार कर्मचार्‍यांना दोन फेऱ्यात कामावरून काढून टाकले आहे.

हे ही वाचा :

Back to top button