Pakistan Economic Crisis | रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० हजार टन गहू चोरीला, ६७ अधिकारी निलंबित | पुढारी

Pakistan Economic Crisis | रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० हजार टन गहू चोरीला, ६७ अधिकारी निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात (Pakistan Economic Crisis) आहे. त्यात लोकांना अन्नधान्यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाने मानवतावादी दृष्‍टीकोनातून पाकिस्तानला पुरवलेला अब्जावधी रुपयांचा गहू चोरीला गेला आहे. या गव्हाची कथित चोरी केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील ६७ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील १० जिल्ह्यांच्या सरकारी गोदामांमधून सुमारे ४०,३९२ टन गहू चोरीला गेला आहे. सिंध अन्न विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गव्हाची चोरी झाल्याचा संशय आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्यांची मोठी टंचाई आहे. यामुळे लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टीकोनातून या महिन्याच्या सुरुवातीला रशियाने पाकिस्तानला ५० हजार टन गव्हाचा पुरवठा केला होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ९ मालवाहू जहाजांद्वारे पाकिस्तानला ४ लाख ५० हजार टन गहू पुरवण्याची रशियाचे नियोजन आहे.

द न्यूज वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गहू चोरी घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात ४९ अन्न पर्यवेक्षक आणि १८ अन्न निरीक्षकांचा समावेश आहे. दादू, लरकाना, शहीद बेनझीराबाद, शाहदादकोट, जेकोबाबाद, खैरपूर, सुक्कूर, घोटकी, संघार आणि मीरपूरखास जिल्ह्यांतील गोदामांमधून गहू चोरीला गेला, असे त्यात म्हटले आहे.

द डॉनच्या वृत्तानुसार, रशियाकडून पाकिस्तानला होणारा गव्हाचा पुरवठा ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. (Pakistan Economic Crisis)

हे ही वाचा :

Back to top button