Pakistan economic crisis | पाकिस्तानात महागाईचा आगडोंब! पेट्रोल प्रति लिटर २७२ रुपये, केरोसीन २०२ रुपयांवर | पुढारी

Pakistan economic crisis | पाकिस्तानात महागाईचा आगडोंब! पेट्रोल प्रति लिटर २७२ रुपये, केरोसीन २०२ रुपयांवर

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन; पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. करवाढीचा समावेश असलेले मिनी-बजेट जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानमध्ये बुधवारी रात्री पेट्रोल आणि गॅसच्या किमती उच्चांकावर पोहोचल्या. पाकिस्तानमध्ये २२.२० रुपयांच्या वाढीनंतर पेट्रोलचा दर प्रति लिटर २७२ रुपयांवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे ही वाढ करण्यात आल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. (Pakistan economic crisis)

हायस्पीड डिझेलच्या किंमतीत १७.२० रुपयांची वाढ केल्याने त्याचा दर प्रति लिटर २८० रुपये झाला आहे. केरोसीन १२.९० रुपयांच्या वाढीनंतर आता प्रति लिटर २०२.७३ रुपयांवर गेले आहे. दरम्यान, लाइट डिझेल तेलाच्या दरात ९.६८ रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते १९६.६८ रुपये झाले आहे. नवे दर गुरुवारी १२ वाजल्यापासून लागू होतील, असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे.

‘मिनी-बजेट’च्या माध्यमातून बजेट तूट कमी करणे आणि कर वसुली वाढविण्याचा पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) च्या नेतृत्वाखालील फेडरल सरकारचा उद्देश आहे. दरम्यान, ‘मिनी बजेट’ आणि पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे.

मूडीज अॅनालिटिक्सचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ कतरिना एल यांनी अंदाज वर्तवला होता की २०२३ च्या पहिल्या सहामाहीत पाकिस्तानातील महागाईचा दर सरासरी ३३ टक्क्यांवर जाऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे, असे जिओ न्यूजने वृत्तांत म्हटले आहे. (Pakistan economic crisis)

हे ही वाचा :

Back to top button