माझी हत्या होऊ शकते, इम्रान खान यांची कोर्टाकडे सुरक्षेची मागणी | पुढारी

माझी हत्या होऊ शकते, इम्रान खान यांची कोर्टाकडे सुरक्षेची मागणी

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकचे मुख्य न्यायाधीश उमर अताल बंदियाल यांना पत्र लिहित, माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. माझ्या संभाव्य हत्येचा प्रयत्न लक्षात घेता न्यायालयात हजर राहण्यासाठी मला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी इम्रान खान यांनी केली आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी पत्रात लिहिले की, माझ्या सरकारची हकालपट्टी केल्यापासून मला अनेकवेळा विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, अनेकवेळा मला संशयास्पद एफआयआर, धमक्या आणि शेवटी हत्येचा प्रयत्न या संकंटांचा सामना करावा लागला आहे. देशाचे माजी पंतप्रधान असूनही पुरेशी सुरक्षा पुरवली जात नसल्याची तक्रार इम्रान खान यांनी केली आहे.

सध्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री माझ्यावर झालेल्या अयशस्वी हत्येच्या प्रयत्नात सहभागी असल्याचा आरोप देखील इम्रान खान यांनी केला आहे. त्यांच्यावर आणखी एका हत्येचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. खान यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आतापर्यंत ७४ गुन्हे दाखल झाले असून, ते पाकिस्तानातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
पुढे इम्रान खान यांनी जगण्याचा अधिकार हा संविधानाच्या अंतर्गत मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्या जीवाला “गंभीर धोका” असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या टीव्ही चॅनेल्सवर ‘लाइव्ह (थेट प्रक्षेपण) आणि रेकॉर्डेड’ भाषणे प्रसारित करण्यावर तत्काळ बंदी घातली आहे. यापूर्वी काही तासांपूर्वी इम्रान खान यांच्यावर तोसाखानाप्रकरणी (सरकारी खजिना घोटाळा) अटकेची टांगती तलवार होती. पण त्यांनी मंगळवारी (दि. ७ मार्च) न्यायालयात हजर राहणार असल्याचे सांगत ही वेळ टाळून नेली. दरम्यान त्यांच्या निवास्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतेवेळी म्हटले होते की, ते कोणत्याही व्यक्तीसमोर किंवा संस्थेसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button