Toshakhana Case : इम्रान खान यांना होणार अटक? निवासस्‍थानाबाहेर समर्थक पोलिसांशी भिडले

Toshakhana Case : इम्रान खान यांना होणार अटक? निवासस्‍थानाबाहेर समर्थक पोलिसांशी भिडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तोशाखाना प्रकरणी ( Toshakhana Case ) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्‍यासाठी आज ( दि. ५ ) स्‍थानिक पोलिस इस्लामाबाद येथील त्‍यांच्‍या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्‍यान, इम्रानच्या अटकेसाठी पोलिसांकडे वॉरंट असल्याचे सांगण्यात येत आहे. इम्रान खान यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर समर्थकांची गर्दी झाली असून, समर्थक आणि पोलिसांमध्‍ये हाणामारीचे प्रकार झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिले आहे.

Toshakhana Case : काय आहे प्रकरण?

२०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता. या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी  इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता.

सत्ताधारी आघाडीच्या साथीदारांनी केली होती तक्रार

सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये इम्रान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ECP) तक्रार केली होती. तोशाखाना (देशातील गोदाम) कडून अनुदानित किंमतीवर खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा खुलासा न केल्यामुळे इम्रानला अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती

Toshakhana Case : तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले अपात्र

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने  केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

अटकेला समर्थकांचा विरोध

दरम्‍यान या प्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्‍यासाठी इस्‍लामाबाद पोलिस त्‍यांच्‍या निवासस्‍थानी पोहचले आहेत. इम्रान खान यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर समर्थकांची गर्दी झाली असून, समर्थक आणि पोलिसांमध्‍ये हाणामारीचे प्रकार झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिले आहे.यावर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फवाद खान म्हणाले की, पोलिसांनी आणि सरकारने परिस्थिती योग्यरित्या समजून घेतली पाहिजे. इम्रान खान यांना अटक झाली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.  त्यांनी कार्यकर्त्यांना जमान पार्कवर पोहोचण्याचे आवाहनही केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news