Political crisis in Nepal | नेपाळमध्ये राजकीय भूकंप, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पुष्प कमल दहल सरकारचा पाठिंबा काढून घेतला | पुढारी

Political crisis in Nepal | नेपाळमध्ये राजकीय भूकंप, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पुष्प कमल दहल सरकारचा पाठिंबा काढून घेतला

काठमांडू : पुढारी ऑनलाईन : नेपालमध्ये राजकीय अस्थिरता (Political crisis in Nepal) कायम आहे. दरम्यान, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने (Rastriya Prajatantra Party) पुष्प कमल दहल (Pushpa Kamal Dahal) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे नेपाळी काँग्रेसने (Nepali Congress) ज्येष्ठ नेते रामचंद्र पौडेल यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. पौडेल यांना ८ पक्षांच्या नव्या युतीचा पाठिंबा असणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ७८ वर्षीय असलेले पौडेल (Ram Chandra Paudel) यांचे राष्ट्रपती बनणे जवळपास निश्चित मानले जात आहे. ते विद्यादेवी भंडारी यांची जागा घेतील. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज २५ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केले जात असून ९ मार्च रोजी मतदान होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी काँग्रेस, सीपीएन-माओवादी सेंटर, सीपीएन-युनिफाइड सोशलिस्ट, राष्ट्रीय जनता पार्टी, लोकतांत्रिक समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनमोर्चा, नागरिक उन्मुक्ती पार्टी आणि जनमत पार्टी या आठ राजकीय पक्षांनी संयुक्त बैठकीत नेपाळी काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रपतीपदावरुन दहल यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल) यांच्यात मतभेद कायम आहेत. २५ डिसेंबर रोजी नवीन सत्ताधारी युती अस्तित्वात आली. तेव्हा राष्ट्रपतीपद यूएमएलला दिले जाणार असल्याचे ठरविण्यात आले होते.

बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने (Rastriya Prajatantra Party) शनिवारी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी समिती आणि खासदारांच्या शनिवारी झालेल्या संयुक्त बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचा आणि आरपीपीच्या सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातून परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आरपीपीने सरकार तसेच प्रांतीय भागातील सरकारांना दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय समीकरणे बदलली

“सत्ताधारी सरकारमधील राजकीय समीकरणे आणि भूमिकेत अचानक बदल होत असल्याने राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे असे मत आहे की अलीकडील बदल हा सरकार अस्थिर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाने सत्तेसोबत राहणे अयोग्य आहे. आम्ही सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजपासून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,” असे राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे प्रवक्ते मोहन कुमार श्रेष्ठ यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Political crisis in Nepal)

हे ही वाचा :

Back to top button