Chinese Spy Balloon : चिनी फुगा करतोय अमेरिकेची हेरगिरी; युएसचे बलूनवर लक्ष | पुढारी

Chinese Spy Balloon : चिनी फुगा करतोय अमेरिकेची हेरगिरी; युएसचे बलूनवर लक्ष

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : अलिकडच्या काही दिवसांपासून काही संवेदनशील भागांवरून उडणाऱ्या संशयित चिनी गुप्तहेर फुग्याचा अमेरिका माग काढत आहे. आकाशात उडणारा गुप्तचर फुगा चीनचा असल्याचा त्यांना पूर्ण खात्री असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नुकतेच ते पश्चिमेकडील मोंटाना राज्यात दिसले. मात्र, लष्करी अधिकारी ते खाली पाडण्यास अनुकूल नाहीत कारण त्यांना खाली पडणाऱ्या मलब्याची चिंता आहे. या संपूर्ण प्रकरणावर चीनने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या परिस्थितीवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. (Chinese Spy Balloon)

अधिकार्‍यांनी सांगितले की, हा फुगा मोंटानामधील बिलिंग्स शहरात दिसण्यापूर्वी अलास्काच्या अलेउटियन बेटे आणि कॅनडाच्या आकाशात दिसला होता. एका वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍याने सांगितले की, जर ते पाडण्याचे आदेश व्हाईट हाऊसने दिले, तर सरकारने त्या परिस्थितीसाठी F-22 सारखी लढाऊ विमाने तयार केली आहेत. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि जनरल मार्क मिली यांसारख्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी बुधवारी या धोक्याचे मुल्यमापन करण्यासाठी बैठक घेतली. (Chinese Spy Balloon)

अमेरिका हा फुगा का फोडत  नाही ? (Chinese Spy Balloon)

हा फुगा पाडण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी अद्याप दिला नाही. कारण या फुग्यासोबत खाली पडणारा फुग्याच्या मलब्याचा जमिनीवर असलेल्या लोकांना धोका पाहचू शकतो. मॉन्टाना या विरळ लोकसंख्येच्या राज्यात देशातील तीन महत्त्वाची अणू क्षेपणास्त्र आहेत. अधिका-यांनी सांगितले की, हा संशयित गुप्तचर फुगा माहिती गोळा करण्यासाठी संवेदनशील भागांवर उडत होता. संरक्षण अधिकार्‍यांनी व अमेरिकेच्या गुप्तचरांनी याबाबत कोणताही उघड धोका नसल्याचे सांगितले आहे. कारण अधिकार्‍यांना हा फुगा कोठून कोठे जात आहे याची कल्पना आहे.

प्रवासी विमानांना किती धोका ?

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी विमानांना या फुग्याचा कोणताही धोका नाही कारण व्यावसायिक विमान कंपन्या उडू शकतील त्यापेक्षा जास्त उंचीवर हा फुगा उडत आहे. संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, अमेरिकेने हे प्रकरण बीजिंग आणि वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाकडे मांडले आहे. पेंटागॉन येथे गुरुवारच्या ब्रीफिंग दरम्यान, अधिका्यांनी फग्याचे वर्तमान स्थान उघड करण्यास नकार दिला. त्याचा आकार आणि इतर गोष्टींबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.


अधिक वाचा :

Back to top button