१२ हजार जणांना नारळ दिल्यानंतर आता Google कडून उच्चपदस्थांच्या बोनसला कात्री | पुढारी

१२ हजार जणांना नारळ दिल्यानंतर आता Google कडून उच्चपदस्थांच्या बोनसला कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतीच १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर आता गुगल (Google) वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्याची योजना आखत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या एका अंतर्गत बैठकीत याबाबत खुलासा केला आहे. उच्च पदावरील अधिकारी आणि इतर वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसमध्ये कपात केली जाणार असल्याचे वृत्त CNBC ने दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वरिष्ठ उपाध्यक्षांना यावर्षी त्यांच्या वार्षिक बोनसमध्ये खूप लक्षणीय घट दिसेल आणि ही बोनस कपात कनिष्ठ पातळीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू नसेल.

“तुमचे पद जितके वरिष्ठ असेल तितका तुम्हाला मिळणारा मोबदला हा तुमची कामगिरी पाहून दिला जातो. तुमची कामगिरी चांगली नसल्यास तुम्हाला मिळणारा आर्थिक लाभ कमी होऊ शकतो,” असे पिचाई यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की गुगल काही आर्थिक लाभ उशिरा देण्याचा विचार करत आहे. पण आता असे दिसते की त्यांनी उच्चपदस्थांना मिळणाऱ्या बोनस रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने या महिन्यात फक्त एकूण बोनसच्या ८० टक्केच रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे आणि उर्वरित रक्कम मार्च किंवा एप्रिलमध्ये दिली जाणार आहे.

नुकतीच गुगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. याआधी अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. या नोकरकपातीच्या घोषणेनंतर अनेक Google कर्मचार्‍यांचा मध्यरात्रीच सिस्टम ॲक्सेस काढून घेण्यात आला आहे आणि त्यांच्यापैकी बहुतांश जणांना कंपनी काढून टाकण्यासाठी काय योजना आखत आहे आणि कोणत्या आधारावर कामावरून कमी केले जात आहे याची कल्पनाच नसल्याचे समजते.

हे ही वाचा :

Back to top button