कंगाल पाकिस्तानच्‍या पंतप्रधानांना उपरती : म्‍हणाले, " पाकिस्‍तानने धडा घेतला आहे ..." | पुढारी

कंगाल पाकिस्तानच्‍या पंतप्रधानांना उपरती : म्‍हणाले, " पाकिस्‍तानने धडा घेतला आहे ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना आता उपरती झाल्‍याचे दिसते आहे. दहशतवादाला खतपाणी, चुकीचे आर्थिक धोरण आणि लष्‍कराने संरक्षणावर केलेली वारेमाप उधळपट्टीमुळे पाकिस्‍तानचे आर्थिक कबंरडे मोडले आहे. यामुळेच आता पाकिस्‍तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना उपरती झाली आहे. दुबईस्थित अरबी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्‍यांनी पाकिस्‍ताननेआजवर केलेल्‍या चुकांची अप्रत्‍यक्ष कबुली दिली. “आमची भारतासोबत तीन युद्धे झाली आहेत आणि त्यांनी लोकांवर आणखी दुःख, गरिबी आणि बेरोजगारी आणली आहे. आम्‍ही यातून धडा घेतला आहे”, असे त्‍यांनी मुलाखतीत स्‍पष्‍ट केले. तसेच त्‍यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी आवाहनही या वेळी केले.
( Pakistan PM Shahbaz Sharif )

Pakistan PM Shahbaz Sharif : पंतप्रधान मोदींना चर्चेचे आवाहन

अरबी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्‍ये शेहबाज शरीफ म्‍हणाले की, “भारतासोबतच्या तीन युद्धांनंतर पाकिस्तानने धडा घेतला आहे. आता आम्‍हाला  शेजाऱ्यासोबत शांतता हवी आहे. भारतीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण काश्मीरप्रश्‍नी गंभीर आणि प्रामाणिकपणे चर्चा करू. तसेच आम्‍ही आमच्‍या देशातील प्रमुख प्रश्‍न सोडवू.”

“भारत आमच्‍या शेजारचा देश आहे. आपण खूप स्पष्ट बोलूया. आता शांततेने जगणे आणि प्रगती करणे किंवा एकमेकांशी भांडणे आणि वेळ वाया घालवणे हे आपल्यावर अवलंबून आहे,” असेही  शरीफ यांनी मुलाखतीवेळी नमूद केले.

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्‍तानला सध्‍या इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्‍यामुळे सरकारविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तसेच देशात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्‍येही वाढ झाल्‍याने सरकारच्‍या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button