Samosas, Biryani in the mountains of the Alps : आल्प्सच्या पर्वतराजीत समोसा, कचोरी, बिर्याणीचा घमघमाट | पुढारी

Samosas, Biryani in the mountains of the Alps : आल्प्सच्या पर्वतराजीत समोसा, कचोरी, बिर्याणीचा घमघमाट

दावोस; वृत्तसंस्था :  पाच दिवसीय जागतिक आर्थिक परिषदेला प्रारंभ होण्याआधी दावोसमध्ये विविध देशांची पॅव्हेलियन्स सजली असून, भारतीय पॅव्हेलियनमध्ये तयार होणार्‍या समोसा, कचोरी, बिर्याणी या अस्सल भारतीय पदार्थांचा घमघमाट विदेशी पाहुण्यांना खेचून घेत आहे. भारतीय पदार्थांनी यंदा बाजी मारल्याचे चित्र आहे.

वर्षभर निपचित पडणारे दावोस बर्फाच्या आच्छादनात असले तरी शहरभर विविध देशांचे रंगीबेरंगी ध्वज आणि विविध देशांची आकर्षक पॅव्हेलियन्स सज्ज झाली आहेत. भारतीय पॅव्हेलियन पहिल्याच दिवशी हिट ठरले ते भारतीय खाद्यपदार्थांनी. येथे तयार होणारे ताजे गरमागरम समोसे, कचोरी, टिक्का, बिर्याणी आणि अस्सल भारतीय प्रकारचे चहा, कॉफी यांचा दरवळ सगळ्यांनाच खेचून घेत आहे. या पॅव्हेलियनमध्ये भारतीयांपेक्षा विदेशी मंडळींचीच गर्दी बघायला मिळत आहे.

शेजारीच महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडूचे पॅव्हेलियन्स आहेत. तसेच टीसीएल, विप्रो, एचसीएल या कंपन्यांचेही कक्ष आहेत. या पाच दिवसांच्या परिषदेत भारताचे 100 हून अधिक उद्योजक, चार केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काही राज्यांचे मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

Back to top button