Joe Biden : जो बायडेन अडचणीत येणार? युक्रेन-इराणसह फायलींत मुलाच्या मृत्यूचे रहस्य | पुढारी

Joe Biden : जो बायडेन अडचणीत येणार? युक्रेन-इराणसह फायलींत मुलाच्या मृत्यूचे रहस्य

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या डेलावेयर येथील बंगल्यात 8 वर्षांपूर्वीच्या गोपनीय फायलींचे 20 संच सापडले आहेत. सरकारी कार्यालयाऐवजी बायडेन यांनी या फायली आपल्या घरात का ठेवल्या, त्याच्या चौकशीसाठी अमेरिकन न्याय विभागाने विशेष समिती नेमली आहे.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना बायडेन (Joe Biden) उपराष्ट्राध्यक्ष होते. तेव्हाच्या या फायली आहेत. मलाच माहीत नाही, की फायलींमध्ये काय आहे आणि त्या माझ्या घरी कशा आल्या, असा खुलासा बायडेन यांनी केला आहे. सीएनएन आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार पहिल्या 10 फायलींच्या संचात युक्रेन, इराण आणि ब्रिटनशी संबंधित माहिती आहे; तर अन्य फायलींत जो बायडेन यांचा मुलगा बी. यू. बायडेन याच्या 2015 मध्ये झालेल्या मृत्यूशी संबंधित माहिती आहे. टॉप सिक्रेट असे लेबल या फायलींवर नमूद आहे. दुसरीकडे या फायलींमध्ये 8 वर्षांपूर्वीच्या ओबामा-बायडेन प्रशासनातील काही नोंदी आहेत, असे बायडेन यांच्या वकिलाचे म्हणणे आहे.

सरकारी फायलींसाठी… (Joe Biden)

  • अमेरिकेत सर्व सरकारी फायली या नोकरशहांच्या ताब्यात असतात. त्यासाठी खास एक्झिक्युटिव्ह शाखा आहे. या शाखेत 5 हजारांवर अधिकारी आहेत.
  • दैनंदिन कामकाजासह सरकार बदलते तेव्हा सर्व संबंधित नेत्यांकडून सर्व सरकारी दस्तऐवज दफ्तरी जमा करण्याचे कामही या अधिकार्‍यांचेच असते.

बायडेन यांच्या अडचणी वाढणार

  • अमेरिकन कायद्यानुसार वर्गीकृत दस्तऐवज बेकायदा पद्धतीने आपल्याजवळ बाळगणे हा गुन्हा आहे. बायडेन यांच्यावर खटला दाखल करायचा तर त्यांनी मुद्दाम कुठल्या तरी हेतूने या फायली आपल्याजवळ ठेवल्या, हे सिद्ध करावे लागेल.
  • ..तसे सिद्धही झाले तरी न्याय विभाग स्थायी धोरणान्वये बायडेट यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय रद्द करू शकतो. बायडेन यांच्या राजकारणाची तर्‍हा पाहता त्यांना फौजदारी खटल्याची भीती वगैरे वाटत नाही, अशी टिप्पणी बीबीसीने केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button