चीनमध्ये ९० कोटी लोक कोरोनाबाधित; ३० दिवसांत ६० हजार मृत्यू | पुढारी

चीनमध्ये ९० कोटी लोक कोरोनाबाधित; ३० दिवसांत ६० हजार मृत्यू

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये कोरोनाची लाट आली आहे. तब्बल 90 कोटी लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. पेकिंग विद्यापीठाच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. चीनची 64 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने जगातील अन्य देशांतही कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 8 डिसेंबर ते 12 जानेवारीदरम्यान 60 हजार बाधितांचा मृत्यू झाला आहे.

चीनने 8 जानेवारी रोजी 3 वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा खुल्या केल्या. यानंतर 4 लाखांवर लोक चीनमध्ये आले आणि चीनमधूनही लोक अन्य देशांत गेले. क्वारंटाईनसारखा प्रोटोकॉलही चीनने संपुष्टात आणला. 8 ते 12 जानेवारी या चारच दिवसांत 4 लाख 90 हजार एन्ट्री आणि एक्झिट सीमेवर नोंदविल्या गेल्या. त्यापैकी अडीच लाख लोक चीनला आले, तर 2 लाख 40 हजार लोक चीनमधून अन्य देशांत गेले. चीनमध्ये चांद्र नववर्ष 21 जानेवारीपासून सुरू होईल. त्यापुढील 40 दिवस देशात 200 कोटी लोकांचे येणे-जाणे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुठल्या प्रांतात किती टक्के बाधित

  • गासू 91
  • हेनान 89
  • युनान 84
  • किंघाई 80

चिनी प्रवाशांवर या देशांत बंदी

भारत, स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जपान, इस्त्राईल, इटली, दक्षिण कोरिया.

पुढे काय?

एका अहवालानुसार 23 जानेवारी रोजी चीनमध्ये कोरोनामुळे 25 हजार लोक मरण पावतील.

कोरोना पीक आणखी 2 ते 3 महिन्यांपर्यंत राहील. चांद्र नववर्षातील उत्सवी गर्दीमुळे देशातील लहानसहान गावांतही हा विषाणू थैमान घालेल.
– जेंग गुआंग,
आरोग्यतज्ज्ञ, बीजिंग

अधिक वाचा :

Back to top button