Afghanistan | काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर आत्मघाती बॉम्बस्फोट, २० ठार, मृतांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश | पुढारी

Afghanistan | काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर आत्मघाती बॉम्बस्फोट, २० ठार, मृतांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश

काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानाची (Afghanistan) राजधानी काबूल पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. काबूलमध्ये अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात किमान पाच नागरिक ठार झाले आहेत. तर तालिबानच्या आणखी एका अधिकाऱ्याने बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २० वर गेला असल्याचे म्हटले आहे. आत्मघातकी हल्ला स्थानिक वेळेनुसार ११:३० वाजता झाला आहे. दरम्यान, मृतांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.

आत्मघातकी बॉम्बरने मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यात केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला, असे तालिबानने म्हटले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे तुर्की आणि चीनसह अनेक देशांचे दूतावास आहेत. इस्लामिक स्टेट- खोरासान प्रांत (Isis-K) म्हणून ओळखल्या जाणार्‍या इस्लामिक स्टेट गटाच्या स्थानिक संघटनेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
ज्यावेळी चीनचे शिष्टमंडळ परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत अफगाण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते त्यावेळीच हा आत्मघाती हल्ला घडवून आणला. काबूलमध्ये आपत्कालीन सेवा देणाऱ्या इटालियन मानवतावादी स्वयंसेवी संस्थेने सांगितले की या हल्ल्यात ४० हून अधिक जखमी झाले आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हा भ्याड हल्ला असल्याचे काबूल पोलिसांनी म्हटले आहे. यामागील गुन्हेगारांना पकडले जाईल असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानात डझनभर स्फोट झाले आहेत. यातील बहुतांश हल्ल्यांची जबाबदारी ‘इसिस-के’ने स्वीकारली आहे. अशा घटनांमध्ये तालिबानकडून मृतांचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काही मीडियांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. (Afghanistan)

हे ही वाचा :

Back to top button