जैश-ए-मोहम्मदशी संबंधित PAFF वर बंदी, अरबाज अहमद मीरला केले दहशतवादी घोषित | पुढारी

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित PAFF वर बंदी, अरबाज अहमद मीरला केले दहशतवादी घोषित

पुढारी ऑनलाईन डेस्क : गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि.६) अरबाज अहमद मीरला दहशतवादी घोषित केले. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित असलेला मीर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. सीमेपलीकडून तो लष्कर-ए-तोयबा (एलईटी) साठी काम करतो. त्यामुळे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ अंतर्गत त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली, त्यानुसार पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या संघटनेवर बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ही संघटना २०१९ मध्ये जैश-ए-मोहम्मदची प्रॉक्सी संघटना म्हणून उदयास आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, PAFF सुरक्षा दल, राजकीय नेते आणि जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या इतर राज्यांतील नागरिकांना वारंवार धमक्या देत आहे. अधिसूचनेनुसार, PAFF इतर संघटनांच्या सहकार्याने तरुणांना शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांसह हल्ले करण्यासाठी भरती करत आहे. त्यानुसार ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.

यासोबतच गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील अरबाज अहमद मीर याला दहशतवादी घोषित केले आहे. तो सध्या पाकिस्तानात राहत असून लष्कर-ए-तोयबासोबत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. यापूर्वी ५ जानेवारी रोजी सरकारने लष्कर-ए-तोयबाची संलग्न संघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) वर बंदी घातली होती.

हेही वाचा :

Back to top button