कराड, पुढारी वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशन तीन आठवडे चालावे, अशी आमची मागणी होती. मात्र सरकारने दोनच आठवड्यांत अधिवेशन गुंडाळले. अनेक बाबींचे कामकाज रेटून नेले असून अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता झाली आहे. त्यामुळे अधिवेशनातून निष्पन्न काय झाले? असा प्रश्न करत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण करू शकत नाही. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे. त्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख हा सिलसिला सुरू राहतो की निकाल लागतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवराज मोरे, मनोहर शिंदे, ऋतुराज मोरे, भानुदास माळी, अभिजित पाटील उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केवळ 20 मंत्री कार्यरत आहेत. 23 जण मंत्री व्हायला तयार नाहीत. कारण कोर्टाने निकाल दिल्यानंतर पद सोडावे लागणार आहे. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीही अद्याप तयार करण्यात आली नाही. त्यामुळे आपण सत्तेवर राहतो की नाही, याची खात्री सत्ताधार्यांना नाही. राज्य सरकारच्या अस्थिरतेमुळे जनतेला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
हिवाळी अधिवेशनामध्ये केवळ दोन तासातच लोक आयुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. एवढा महत्त्वाच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत, याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा व केंद्राचा राज्यावर असलेला दबाव कारणीभूत आहे. याबाबत अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. केंद्र सरकार नेहमीच महाराष्ट्रावर अन्याय करत आले आहे.
रस्ते, पूल त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य या महत्त्वाच्या विषयाकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. अकरा हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. सामाजिक पायाभूत सुविधांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष आहे. श्रीमंत गरीब दरी वाढत चालली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे. इतिहासात या सरकारने सर्वात जास्त कर्ज काढले आहे. कर वाढवले आहेत. आत्तापर्यंत मोदी सरकारने कर स्वरूपात 28 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. एवढे करूनही त्यांना पैसा कमी पडत आहे. त्यामुळे सरकारी उद्योग विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. एलआयसी सारखी विमा कंपनी विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वेचे खाजगीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात सर्व रेल्वेचे खाजगीकरण झाले तर आश्चर्य वाटू नये. केवळ आदानींना फायदा कसा होईल हे पाहिले जात आहे.
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. 26 जानेवारीनंतर 'हात से हात जोडो' हा यात्रेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे, असे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.