Vladimir Putin : एखादा मंत्री नव्हे, पुतीन यांचा स्वयंपाकी होणार रशियन राष्ट्राध्यक्ष? | पुढारी

Vladimir Putin : एखादा मंत्री नव्हे, पुतीन यांचा स्वयंपाकी होणार रशियन राष्ट्राध्यक्ष?

मॉस्को; वृत्तसंस्था : गेली 316 दिवस युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू आहेत. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी व अनेकदा रशियन सैन्याला पराभवाची चव चाखावी लागली आहे. दुसरीकडे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. पुतीन यांची जागा त्यांचा एखादा मंत्री नव्हे तर त्यांचा स्वयंपाकी घेणार असल्याची शक्यता रशियाच्या राजकीय वर्तुळात आहे. (Vladimir Putin)

पुतीन यांच्या या शेफचे नाव येवगेनी प्रिगोजिन (वय 61) असे आहे. येवगेनी कट्टरपंथीयांमध्ये लोकप्रिय आहेत. कट्टरपंथीयांमध्ये पुतिन यांच्यापेक्षा येवगेनी यांना अधिक कट्टर मानले जाते. युक्रेन युद्धातील अपयशाबद्दल येवगेनी उघडपणे रशियन संरक्षण मंत्रालय आणि संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्यावर टीका करत आहेत. पुतीन त्यांना याबद्दल काही बोलतही नाहीत. यावरून तेच पुतीन यांचे वारसदार मानले जात आहेत. पुतीन यांना पार्किन्सन्स, कॅन्सर असल्याचे म्हटले जाते. त्यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी येवगेनी आघाडीवर असतील. येवगेनी यांना अनेक फौजदारी गुन्ह्यांत शिक्षा झाली होती. देशाच्या विघटनानंतर ते सुटले. पुढे शेफ म्हणून नाव कमावले. स्वत:चे हॉटेल सुरू केले. पुतीन यांचे स्वयंपाकी व निकटवर्तीय बनले. युक्रेन युद्धाची संधी साधून येवगेनी यांनी स्वत:चे सैन्यही उभारले. (Vladimir Putin)

भाडोत्री फौजेचे बळ!  

युक्रेन युद्धात रशियाने नियमित लष्करासोबतच भाडोत्री सैनिकांची फौजही उभी केली. यात येवगेनी यांच्या व्हॅगनर ग्रुप या भाडोत्री सैनिकांची पलटण रशियातील सर्वात प्रभावी लढाऊ शक्ती म्हणून समोर आली आहे. रशियन सैन्याला येवगेनी या पलटणीपेक्षा कमी लेखत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button