नोकरकपातीची लाट! Amazon कडून १८ हजार जणांना नारळ, Salesforce मध्ये १० टक्के नोकरकपात | पुढारी

नोकरकपातीची लाट! Amazon कडून १८ हजार जणांना नारळ, Salesforce मध्ये १० टक्के नोकरकपात

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक मंदीमुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरुच आहे. आता ऑनलाइन रिटेलर ॲमेझॉन (Amazon) १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांच्या पब्लिक स्टाफ नोटच्या हवाल्याने रॉयटर्सने वृत्त दिले आहे. अ‍ॅमेझॉन आता १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार असल्याची शक्यता यातून व्यक्त केली आहे.

या नोकरकपातीचा मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या ई-कॉमर्स आणि मानव संसाधनांवर परिणाम होणार आहे. नोकरकपातीच्या यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांशी कंपनी १८ जानेवारीपासून संपर्क साधण्यास सुरुवात करणार आहे. ज्या १८ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे ते Amazon च्या अंदाजे ३ लाख कॉर्पोरेट कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणारे ६ टक्के कर्मचारी आहेत.

जॅसी यांनी नोटमध्ये म्हटले आहे की वार्षिक नियोजन अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे अधिक कठीण झाले आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे. अॅमेझॉनमध्ये वेअरहाऊस कर्मचार्‍यांसह १५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. अॅमेझॉनने आधी १० हजार नोकरकपातीचे लक्ष्य ठेवले होते. नोव्हेंबरपासून ही नोकरकपात सुरु आहे.

दरम्यान, अॅमेझॉन इंकने मंगळवारी जाहीर केले की त्यांच्या ई-कॉमर्स कंपनीला ८ अब्ज डॉलर कर्ज पुरवठा करण्यासाठी काही कर्जपुरवठादारांशी करार केला आहे. यातून मिळणारे पैसे कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील. वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च कमी केला आहे. याचा फटका ॲमेझॉनच्या व्यवसायाला बसला आहे.

सेल्सफोर्समध्ये १० टक्के नोकरकपात

केवळ ॲमेझॉनच नाही, तर अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स इंकने (Salesforce Inc) बुधवारी सांगितले की पुनर्रचनेचा एक भाग म्हणून सुमारे १० टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची त्यांची योजना आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की त्यांना आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागत आहे. कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Back to top button