

पुढारी ऑनलाईन : तालिबान संघटनेचा नेता अहमद यासिर याने ( Taliban Leader Ahmad Yasir ) ट्वीटच्या माध्यमातून पाकिस्तानला धमकी दिली आहे. तसेच १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचा फोटो शेअर करत भारतीय लष्कराचे कौतुकही केले आहे.
मागील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेने आमच्या देशात दशतवादी हल्ले रोखावेत अन्थया आम्हाला, अफगाणिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करावा लागेल, अशी धमकी पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी नुकतीच दिली होती. याला तालिबानचा नेता अहमद यासिर याने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ( Taliban Leader Ahmad Yasir )
पाकिस्तानला ट्वीटच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्युत्तरात अहमद यासिर याने म्हटलं आहे की, आमच्यावर लष्करी हल्ला करण्याचा विचार करुन नका. अन्यथा भारतासोबत तुम्ही जसा लष्करी करार केला, अशीच लाजीरवाणी परिस्थिती पुन्हा एकदा तुमच्यावर ओढावेल. यासिर याने १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाकिस्तानी सैन्य भारतासमोर आत्मसमर्पण करत असल्याचा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये युद्ध झाले. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या वेळी पाकिस्तानच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांनी भारतासमोर आत्मसमर्पण केले होते. यासंदर्भातील करारावर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान यांनी स्वाक्षरी केली होती. हाच फोटो यासिर याने शेअर केला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा देखील दिसत आहेत. १९७१च्या युद्धानंतर बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र देश झाला होता.
हेही वाचा :