भाजप मिशन २०२४ : जानेवारी महिन्यात अमित शहा करणार ११ राज्यांचा दौरा (BJP Mission 2024) | पुढारी

भाजप मिशन २०२४ : जानेवारी महिन्यात अमित शहा करणार ११ राज्यांचा दौरा (BJP Mission 2024)

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुकीला अजून दीड वर्षांचा कालावधी बाकी असला तरी भारतीय जनता पक्षाच्या ‘मिशन 2024‘ ला  (BJP Mission 2024) आतापासूनच सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून चालू महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 11 राज्यांचा दौरा करणार आहेत.

गत लोकसभा निवडणुकीत  (BJP Mission 2024) पराभव पत्करावा लागलेल्या सुमारे दीडशे लोकसभा मतदारसंघावर भाजपने आपले लक्ष केंद्रीत केलेले आहे. हे मतदारसंघ पिंजून काढण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. या दृष्टीने प्रत्येक मंत्र्याकडे तीन ते चार मतदारसंघ देण्यात आलेले आहेत. पक्ष संघटन मजबूत करणे तसेच कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधून बूथ स्तरापर्यंत मजबुती आणण्याचे पक्षाचे उदि्दष्ट आहे. विशेषतः संबंधित मतदारसंघांतील पक्षीय मतभेद दूर करण्यावर भर देण्यास मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.

ज्या राज्यांत भाजप कमजोर स्थितीत आहे, अशा राज्यांवर गृहमंत्री अमित शहा यांची विशेष नजर आहे. अलिकडील काळात त्रिपुरामध्ये अनेक आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांत प्रवेश केलेला आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांचा चालू महिन्यातील पहिला दौरा त्रिपुराचा राहणार आहे. 5 तारखेला ते त्रिपुराला जात असून याठिकाणी काढल्या जाणाऱ्या यात्रेत ते सामील होणार आहेत. 6 जानेवारीला शहा मणिपूर आणि नागालँडचा दौरा करतील. वरील तिन्ही राज्यांत पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने शहा यांचा ईशान्य भारताचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमित शहा हे 7 तारखेला छत्तीसगड आणि झारखंडचा दौरा करतील. त्यानंतर 8 तारखेला ते आंध्र प्रदेशात पोहोचतील. मकर संक्रांतीनंतर 16 तारखेला ते उत्तर प्रदेशात तर 17 तारखेला प. बंगालला जाणार आहेत. भाजपचे महासचिव म्हणून कार्यरत असताना शहा यांनी 2014 साली उत्तर प्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी सांभाळत पक्षाला भरघोस यश मिळवून दिले होते. 28 जानेवारी शहा उत्तर कर्नाटकातील हुबळीचा दौरा करणार आहेत. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सामील होतील. महिन्याच्या अखेरीस 29 तारखेला ते पंजाब आणि हरियानाचा देखील दौरा करणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button