Australia helicopter collision : अपघाताचा थरार! दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक, ४ ठार (व्हिडिओ) | पुढारी

Australia helicopter collision : अपघाताचा थरार! दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक, ४ ठार (व्हिडिओ)

गोल्ड कोस्ट : पुढारी ऑनलाईन; दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन (Australia helicopter collision) झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील सी वर्ल्डजवळ घडली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की एक हेलिकॉप्टर टेक ऑफ करत होते तर दुसरे लँडिंग करत असताना हा अपघात झाला, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी दिली आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला. अन्य तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे ते एकाच हेलिकॉप्टरमधील आहेत. चार मृतांमध्ये दोघे ब्रिटनमधील नागरिक आहेत, असे वृत्त बीबीसीने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.

इमर्जन्सी लँडिंग करणाऱ्या दुसऱ्या एका हेलिकॉप्टरमधील सहा जणांपैकी पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ” ज्यांना या अपघातात हानी झाली आहे त्यांच्याप्रति माझी सहानुभूती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो या अपघाताच्या घटनेचा तपास करत आहे. ब्रिस्बेनच्या दक्षिणेस सुमारे ७५ किमी (४७ मैल) अंतरावर मेन बीच म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्यटन स्थळाजवळच हा अपघात घडला.

क्वीन्सलँड पोलिस सेवेतील गॅरी वॉरेल यांनी सांगितले की अपघातग्रस्त हेलिकॉप्टर समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर येऊन पडले. या ठिकाणी आपत्कालीन सेवा पोहोचवणे अवघड झाले होते.” या अपघाताची छायाचित्रे समोर आली असून एका हेलिकॉप्टरचे अवशेष सी वर्ल्ड रिसॉर्टच्या समोर पाण्याच्या काठावर वाळूत पडलेले दिसतात. तर दुसरे हेलिकॉप्टर धडक झाल्यानंतर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सी वर्ल्ड वेबसाइटनुसार या ठिकाणी पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी हेलिकॉप्टर तसेच इतर चार्टर ऑपरेशन्सची सोय केली जाते. गोल्ड कोस्टमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरु असून येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी असते. (Australia helicopter collision)

हे ही वाचा :

Back to top button