चीनकडून भाडोत्री भारतीय तरुणांचा वापर | पुढारी

चीनकडून भाडोत्री भारतीय तरुणांचा वापर

बीजिंग/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत 25 कोटी चिनी नागरिकांना कोरोनाची बाधा झाला होती. रुग्णांना हॉस्पिटल्स, तर मृतांना स्मशानभूमी अपूर्ण पडत होत्या. या आणि अशा स्वरूपाच्या बातम्या चीनमधून येत असताना चीनच्या विविध शहरांतील रस्त्यांवर फिरत, चीनमध्ये कोरोनाची लाट आलेली नाही, इथे सगळे आलबेल आहे, अशी माहिती देणार्‍या भारतीय तरुणांचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. चीन सरकारकडूनच चीनमध्ये सगळे आलबेल आहे, हे भासविण्यासाठी या भाडोत्री भारतीय तरुणांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिनपिंग सरकारने डिसेंबरच्या सुरुवातीला शून्य कोरोना धोरण मागे घेतले. नवीन रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या सुरुवातीला खूप कमी सांगितली, नंतर माहिती देणेच बंद केले. चीनमधील काही भारतीय चीनमध्ये कोरोना नाही. भारतीय माध्यमांत चीनबाबत येणार्‍या बातम्या चुकीच्या आहेत, असे सांगत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. भारतात तर अशा व्हिडीओंची लाटच आली.

हे व्हिडीओ तयार करण्यासाठी चीनमधील भारतीयांना तेथील सरकारकडून भाग पाडले जात आहे, अशी धक्कादायक माहिती चीनमधील भारतीयांकडूनच नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर समोर आली आहे. कोरोनामुळे चीनची प्रतिमा डागाळू नये म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक युनिटशी संबंधित भारतीय लोक असे व्हिडीओ बनवत आहेत. भारतीयांकडूनच नव्हे, तर चीनमध्ये राहत असलेल्या अन्य देशांतील लोकांकडूनही चीन सरकार त्या-त्या भाषांतून असे व्हिडीओ बनवून त्या-त्या देशांत व्हायरल करण्यास प्रवृत्त करत आहे.

Back to top button