

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात सध्या लाल खेकड्यांचा महापूर आलेला पाहायला मिळत आहे. या खेकड्यांनी रस्ते आणि बागा व्यापल्या आहेत. हे खेकडे ऑस्ट्रेलियाच्या ख्रिसमस बेटावरील आहेत. ते वर्षावनातून दरवर्षी समुद्रात जातात. हा त्यांच्या मिलनाचा आणि अंडी देण्याचा हंगाम आहे. सध्या सुमारे 6.5 कोटी लाल खेकडे ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत.
हे खेकडे वर्षभर बेटाच्या मातीत लपून राहतात आणि पावसाळा आला की बाहेर पडतात. या खेकड्यांचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियातही आले आहेत. त्यांच्यामुळे रस्त्यांवर लाल गालिचा अंथरल्याचे द़ृश्य निर्माण झाले आहे. या खेकड्यांचे स्थलांतर पहिल्या पावसानंतर लगेचच सुरू होते. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्याने तेथील ऋतुचक्र हे उत्तर गोलार्धातील देशांपेक्षा वेगळे असते.
त्यामुळेच तेथील खेकड्यांचे हे स्थलांतर सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते. कधी कधी ते डिसेंबर-जानेवारीतही होते. या खेकड्यांमुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या खेकड्यांना सुरक्षितपणे वाट करून दिली जात असते. स्थलांतर करीत असताना नर खेकडे सर्वात पुढे असतात. माद्या आपल्या ब्रुड पाऊचमध्ये सुमारे दहा लाख अंडी ठेवतात; मात्र त्यापैकी अतिशय कमी संख्येने पिले जिवंत राहतात.